वाशिम जिल्ह्यातील पाईकराव कुटुंब. या कुटुंबातील प्रमुख किशोर विश्राम पाईकराव (वय ४०) त्यांना पत्नी आणि दोन मुलं आहे. काही वर्षांपूर्वी किशोरला दारुचं व्यसन लागलं. मात्र, त्यातूनच पती-पत्नींमध्ये (माया किशोरची पत्नी) सतत वाद होत होते. किशोर पत्नीला दररोज मारहाण करायचा. इतकंचं नाही, दोन्ही मुलं मोठा मुलगा जितेंद्र आणि अश्विन यांनाही माराहण करायचा. दररोजच्या दारुच्या व्यसनातून मृत किशोर याचे पत्नी आणि मुलांमध्ये वाद होत होते. या कटकटीला वैताकून पत्नी माया आणि मुलांनी वडिलांपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला. एका वर्षांपूर्वी आई आणि मुलं वाशिममधून अकोला शहरात राहायला आले. इथेही वडिलांचा त्रास सुरू झाला. अधून-मधून ते इथे येऊन पत्नीसोबत वाद घालायचे.
किशोर दारू पिऊन घरी आला आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर गुरुवारी दुपारी दारू पिऊन पत्नीच्या घरी आला आणि त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तिला मारहाणही करू लागला. हा प्रकार मोठा मुलगा जितेंद्र पाहत होता, त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावरही वडिलांनी हात उचलला. यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि जितेंद्रने वडिलांच्या डोक्यात दगड घातला.
या घटनेत वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसंच मारेकरी मुलगा जितेंद्र यालाही ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिली.
वडिलांना सोडल्यानंतर असा सुरू होता उदरनिर्वाह
तिघेही माय-लेकं वाशिममधून एका वर्षापूर्वी अकोल्यात राहायला आले. इथे माया ६ हजार रुपये दर महिना अशा पगारावर मुलींच्या वस्तीगृहात कामाला होत्या. दोन्ही मुलांचं शिक्षण सुरू आहे. वडिलांची हत्या केलेला मुलगा जितेंद्र याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून त्याचा निकाल येणं बाकी आहे. जितेंद्र हा अभ्यासात हुशार असल्याचीही माहिती आहे. त्याचे वडील किशोर हे गेल्या सहा दिवसापूर्वी अकोल्यात आले होते.
गुरुवारी दुपारी दारु पिऊन घरी आल्यानंतर त्यांनी वाद घातला. मुलगा जितेंद्र हा त्याच्या वडिलांना आईला मारहाण करण्यापासून विरोध करत होता. त्याचा त्यांना मारण्याचा उद्देश नव्हता असं पत्नी माया यांचं म्हणणं आहे.