• Tue. Nov 26th, 2024

    पाऊस कमी आल्यास आकस्मिक उपाययोजनेसाठी सज्ज राहा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    May 12, 2023
    पाऊस कमी आल्यास आकस्मिक उपाययोजनेसाठी सज्ज राहा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर,दि.12 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार या हंगामात पाऊस कमी आल्यास पीकपद्धतीत बदल व अन्य उपाययोजनांच्या पर्यायासाठी प्रशासनाने तयार असावे, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

    वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे आयोजित नागपूर जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनिल केदार, राजू पारवे, विकास कुंभारे, समिर मेघे, आशिष जायसवाल, अभिजित वंजारी, टेकचंद सावरकर, प्रवीण दटके, मोहन मते, उपाध्यक्ष कुंदा राऊत, कृषी सभापती प्रवीण जोध, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आदिंची उपस्थिती होती.

    जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी यावर्षीच्या कृषी विभागाच्या नियोजनांचे सादरीकरण केले. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी या बैठकीत मांडलेल्या विविध सूचनांचे स्वागत केले. ते म्हणाले, यावर्षी बियाण्यांची उपलब्धता आहे. याशिवाय उच्चप्रतीचे घरगुती बियाणे निर्मितीची तयारी आहे. खतांची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे. मागील वर्षीचा साठा 80 टक्के उपलब्ध आहे. त्यामुळे खतांची अडचण नाही. तथापि, बियाणे, खते, किटकनाशके यांचा तुटवडा भासणार नाही अशी तरतूद करुन ठेवा.

    ‘अल निनो’च्या प्रभावाने पावसाला उशीर झाला तर कदाचित कापसाची पेरणी कमी होईल. अशावेळी आकस्मिक कृती आराखडा तयार ठेवा. सोयाबीन, तुरीचे बियाणे अधिक लागले तर त्याची उपलब्धता ठेवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

    यांत्रिकीकरणाच्या संदर्भात अधिक भर या मोसमात द्यावा. रुंद वरंभा सरी पेरणीयंत्र (बीबीएफ) द्वारे पेरणी करावी. यामुळे जमीनीत पाण्याचा ओलावा अधिक राहतो व निचरा होतो. जिल्ह्यात अधिकाधीक पेरणी यंत्रामार्फत व्हावी, यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

    नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून यावर्षी ड्रोनद्वारे फवारणी करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागाला तशी सूचना केली आहे. बचत गटांना यामध्ये सहभागी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

    मुख्यमंत्री सौर ऊर्जामध्ये नागपूर जिल्ह्यात काम चांगले झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. 30 टक्के फिडर उभारण्यात आले आहे. पुढील काळात संपूर्ण शाश्वत ऊर्जावर आधारीत रचना करण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित फिडर लवकर उभारली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात अतिरिक्त 10 हजार हेक्टर क्षेत्र वाहितीखाली आले आहे. जिल्ह्यातील 243 गावांची निवड झाली आहे. जुन्या गावांना देखील सहभागी करा. यामध्ये सामाजिक संस्थांना सहभागी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    शेतकऱ्यांना खासगी खरेदी-विक्री करतांना फसवणूक होत असल्याचे उपस्थित लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिले. त्याबाबत गृहखाते प्रचलित कायद्याद्वारे कारवाई करतील. तसेच किटकनाशके, खते, बियाणे यामध्ये फसवणूक होणार नाही, यासाठी तपासणी यंत्रणा गतीशील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विक्रमी तूर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ई-ऑफिस बळकटीकरणाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लॅपटॉप वितरीत करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद उपरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद मनोहरे यांनी केले.

    ०००००

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed