• Sun. Sep 22nd, 2024

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत निकषात बसणाऱ्या कामांनाच प्राधान्य- देवेंद्र फडणवीस

ByMH LIVE NEWS

May 12, 2023
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत निकषात बसणाऱ्या कामांनाच प्राधान्य- देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.१२: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमध्ये प्रत्यक्ष खाणबाधीत क्षेत्रामधील विकास कामांसोबत निकषात बसणाऱ्या जलसंधारण, पर्यावरण आदी कामे प्राधान्याने घ्यावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

वनामती सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीस खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुनिल केदार, समिर मेघे, टेकचंद सावरकर, आशिष जयस्वाल, राजू पारवे, मोहन मते, तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकरसिंग भोंड यावेळी उपस्थित होते.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 2016-17 पासून 1023 कोटी 13 लाख रुपये जमा झाले असून यामध्ये प्रामुख्याने कोळसा प्रमुख गौण खनिजाचा समावेश आहे.  प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निकषानुसार उच्च प्राथम्य बाबींसाठी 60 टक्के तर अन्य प्राथमिक बाबींसाठी 40 टक्के निधी खर्च करण्यात येत असून त्याअंतर्गत 824 कोटी 37 लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 535 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून 366 कोटी 36 लक्ष रुपये मार्च अखेरपर्यंत खर्च झाला आहे.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमध्ये जिल्ह्यात प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात जिल्हास्तरीय तांत्रिक समिती गठीत करून निकषात बसणाऱ्या कामांना प्राधान्यक्रमाने कामे घ्यावीत अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत जलसंधारण कामांमध्ये गाळ काढणे, तसेच पर्यावरणाशी निगडीत कामे प्राधान्याने पूर्ण करतांनाच प्रत्यक्ष खाणबाधीत क्षेत्रामध्ये  आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन व प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजनांची कामे घेतांना सबंधीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या. महिला व बालकल्याण, वरिष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींचे कल्याण, कौशल्य विकास या कामांसोबत अन्य प्राथम्य असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास, जलसिंचनाचे पर्यायी स्रोत विकसित करणे, ऊर्जा व पाणलोट क्षेत्र विकास आदी कामेसुद्धा निकषानुसार घ्यावीत.

नियामक परिषदेच्या सदस्यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमध्ये विविध विकासकामे घेतांना तेथील पायाभूत सुविधांचा विकास तसेच लोकोपयोगी कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे, उपलब्ध निधी तसेच विविध विकास कामांवर झालेला खर्च व एकूण दायित्व याबाबत माहिती दिली.

उपस्थितांचे आभार जिल्हा खनिज विकास अधिकारी ओंकारसिंग भोंड यांनी व्यक्त केले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed