• Sat. Sep 21st, 2024

धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा

ByMH LIVE NEWS

May 12, 2023
धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा

धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. या भागातील वाड्या-वस्त्यांना बारमाही रस्ता जोडण्याचे नियोजन सुरू आहे. याबरोबरच या भागातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम गावांना पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांचे धान्य, या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये साथरोग प्रतिबंधक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी धुळे जिल्हा नवसंजीवन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, खासदार डॉ. हीनाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या धुळे प्रकल्पाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, धुळे पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी श्री खोंडे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, जिल्ह्यातील दुर्गम भागात आवश्यक मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्धतेचे नियोजन करीत स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पावसाळ्यात सर्व नागरीक आपल्या गावी राहत असल्याने स्थलांतरीत नागरीकांचे सर्वेक्षण करावे. ज्यांच्याकडे जमीन उपलब्ध आहेत. त्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देता येईल याबाबत नियोजन करावे. जेणेकरुन स्थलांतर कमी करण्यास मदत होईल. अमृत आहार वेळेत उपलब्ध करून देतानाच तो दर्जेदार असेल याची दक्षता घ्यावी. आगामी काळात प्रत्येक वाडी, वस्तीचे विद्युतीकरण करण्यात येईल. त्यासाठी जलदगतीने कार्यवाही करावी. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामासाठी निधी प्राधान्याने देण्यात येईल. नवीन इमारतीचे बांधकाम करतानाच तेथे सौर ऊर्जा युनिट आवश्यक करावेत. जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी देत पाणीपुरवठा करावा. या योजनेतून प्रत्येक नागरीकाला स्वच्छ पाणी द्यावे. त्याचबरोबर शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी चांगला रस्त्यांचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्यात. तसेच नवसंजीवन योजनेतील गावांतील मुलभूत सुविधांचा आढावा घेतला.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी. संबंधित विभागांनी जिल्ह्यातील दुर्गम भागाच्या संपर्कात राहावे. कुपोषण निर्मूलनासाठी उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी दिल्या. खासदार डॉ. गावित यांनीही विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी नवसंजीवन योजनेबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सिंचन प्रकल्पांचा घेतला आढावा यावेळी मंत्री गावीत यांनी साक्री व शिरपुर तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. साक्री तालुक्यातील 4 मध्यम, 24 लघु प्रकल्प असून शिरपूर तालुकयात अनेर व करवंद हे 2 मध्यम प्रकल्प आहेत. मंत्री महोदयांनी या प्रकल्पांची सद्याची स्थिती, उपलब्ध पाणीसाठी, पिण्याचे पाण्याचे आरक्षण, या भागातील पाणीटंचाई आदिंबाबत आढावा घेतला.  त्याचबरोबर या भागात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान तसेच जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा 2 प्रभावीपणे राबवावा. जिल्ह्यात पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे गावात पाणी शिरते अशा ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed