गडाख एकेकाळी पवार यांचे खंदे शिलेदार होते. गेल्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळाले. शिवसेना फुटीच्यावेळी गडाख ठाकरे यांच्यासोबतच राहिले. याची आठवण ठेवत आज उध्दव ठाकरे स्वत: सोनई येथे आले. जाहीर कार्यक्रम न ठेवता त्यांनी गडाख यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यापूर्वी गडाख यांनी वाढदिवसानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मात्र त्यांनी ठाकरे यांच्यासोबतच पवार यांचेही कौतुक केले.
गडाख म्हणाले, ऐंशी पार केल्यानंतरही शरद पवार राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांची एकूण कारकीर्दही संघर्षमय आहे. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही. आजारपण किंवा वयाचे कारण देऊन ते थांबले नाहीत. या वयातही ते लोकांमध्ये जातात. या वयात अशी हिंमत दाखविणारा कदाचित ते शेवटचा नेता ठरतील. म्हणूच राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणातही त्यांचे वजन आहे. हाच विचार करता परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आतापर्यंत त्यांना हे पद मिळाले नाही, याला कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी आहे. त्यांच्याकडून पवारांबद्दल श्रेष्ठींचे काम भरले जात. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडत असे. आम्ही मात्र त्यांच्या कायम पाठीशी राहिलो. नरसिंहराव यांच्यावेळीही आमची पसंती पवारांनाच होती, असेही गडाख म्हणाले.
ठाकरेंवर भरभरुन बोलले
ठाकरे कुटुंबियांबद्दलही गडाख भरभरून बोलले. ते म्हणाले, ठाकरेंशी आमची मैत्री जुनीच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. तेच संबंध पुढे उद्धव ठाकरे यांच्यासोबतही राहिले. यावेळी विधानसभेला शिवसेनेला जागांची जमवाजमव करायची होती. तेव्हा त्यांनी आमच्याकडे आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठिंब्यासंबंधी विचारणा केली. तेव्हा शंकरराव मुंबईला जाऊन ठाकरे यांना भेटून आले. आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंत्रिपद द्या किंवा नका देऊ आम्ही तुमच्यासोबत राहु, असा शब्द मी ठाकरे यांना दिला. पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले. ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले. आमच्या पाठिंब्याची जाणीव ठेवत त्यांनी ज्येष्ठांना डावलून शंकरराव यांना मंत्रिपद दिले. त्यामुळे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहायचे असे मी शंकराराव यांना सांगितले. मधल्या काळात आम्हालाही अनेक प्रलोभने आली होती. तरीही आम्ही ठाकरे यांची साथ सोडली नाही, असेही गडाख यांनी सांगितले.
उद्धव मुरलेले राजकारणी नाहीत, गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा विषय चर्चेत आला आहे. त्यावर बोलताना गडाख म्हणाले, उद्धव हे काही मुरलेले राजकारणी नाहीत. त्यांनी यातील कटू अनुभवचा पूर्वी सामना केलेला नाही. त्यामुळे गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. असे असले तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता ठाकरे यांना आणि महाविकास आघाडीलाही नक्की साथ देईल, असे सांगताना गडाख यांनी आपला स्वत:चा अनुभव सांगितला.
पूर्वी एका निवडणुकीच्यावेळी त्यांचे खासदरपद रद्द करून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. त्याचा अनुभव सांगताना गडाख म्हणाले, मी फक्त बोललो होतो. तरीही माझी खासदारकी गेली. पुढे सहा वर्षे अपात्रही ठरविले. मात्र, मी धीराने सामोरे गेलो. तसेच आता उद्धव ठाकरेही अडचणीला धीराने सामोरे जात आहे. कधी ना कधी यात यश येतेच, असेही गडाख म्हणाले.