• Mon. Mar 16th, 2026

    करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा

    ByMH LIVE NEWS

    May 11, 2023
    करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 11 : ‘‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संबधी दिशा देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांचे करिअर विषयक विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांचे समाधान तातडीने उपलब्ध होईल’’,  असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केले.

    श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन एसएनडीटी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले.

    शिबिर उद्घाटनावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. लोढा बोलत होते. व्यासपीठावर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, व्यवसाय व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, उपसंचालक राजेंद्र संखे आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. लोढा म्हणाले की, इयत्ता 10 वी 12 वी नंतर पुढे काय संधी उपलब्ध आहेत त्याच्या मार्गदर्शनाबाबत हे शिबीर आहे. विभाग निर्माण करीत असलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपले प्रश्न नोंदवायचे आहेत. त्या प्रश्नांना ऑनलाईनच उत्तरे देण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर विषयक प्रश्नांचे समाधान तातडीने होईल.

    कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या की, आपणाला जे आवडते व जे नाही आवडत, ते ठरवून करिअरचा मार्ग निवडावा. पुढील पाच वर्षात आपण कुठे राहू, याचाही विचार करावा. तुमच्यामुळे भविष्यातील भारत घडणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. विचार हे मनुष्याचे व्यक्तिमत्व घडवित असतात. त्यामुळे चांगले, प्रेरक विचार असावेत. आपल्या विचारांतून कार्य होत असते. विचार केवळ स्वत:साठी करावयाचा नसून समाजाच्या कल्याणासाठी विचार करावा. त्या पद्धतीचे करीअर निवडावे.

    मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात संचालक श्री. दळवी यांनी सांगितली.

    ००००

    निलेश तायडे/ससं/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed