पीडित महिला विधवा असून तिला दोन मुलं आहेत. महिलेला आधार नसल्याचं आरोपी शोएबच्या लक्षात आलं. याचा फायदा घेत शोएबने महिलेला आधार देण्याचे आश्वासन दिले. महिलेचा विश्वास संपादित करून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर विवाह करण्याचं आमिष दाखवून महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मात्र आयुष्यभराचा जोडीदार होण्याचे स्वप्न दाखवणारा शोएब हा काही दिवसानंतर अचानक गायब झाला. तो पीडित महिलेला भेटण्यास टाळत होता. यावेळी शोएब याची काही अडचण असेल असा समज पीडित महिलेला झाला. त्यानंतर शोएब याने महिलेचे कॉल घेणे देखील बंद केले. अचानक घडलेल्या या संपूर्ण घटनांमुळे महिलेच्या मनात प्रश्न निर्माण झाले. दरम्यान तिने याप्रकरणी शोएबबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली. आयुष्यभराची साथ देण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या शोएब विवाह केल्याची धक्कादायक माहिती महिलेला मिळाली.
दरम्यान, ही बाब लक्षात येताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तात्काळ सिडको पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे करीत आहेत.