• Fri. Mar 20th, 2026
    अजितदादांचा टुकार कारट्यांना बारामतीत इशारा, माझ्या पद्धतीने…

    बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘सहयोग सोसायटी’ निवासस्थान परिसरामध्ये शनिवारी (दि. ६) एका तरूणीचा विनयभंग झाला होता. याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आज बारामती दौऱ्यात अजित पवार यांनी याप्रकरणाचा उल्लेख करत कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही म्हणत टुकार कारट्यांना निर्वाणीचा इशाराच दिलाय.नेमकी घटना काय?

    अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ एका तरुणीला मारहाण झाली. संबंधित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अरफाज सादिक आत्तार (रा. कोष्टी गल्ली, बारामती) याने तरुणीचा विनयभंग करुन तिला मारहाण केली. ‘तू मला आवडते’, असे म्हणत तिच्या गालावरुन हात फिरवत तिचा विनयभंगही केला.

    दादांचा बारामतीत टुकार कारट्यांना इशारा

    शनिवारी सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास सहयोग सोसायटीच्या आवारात ही घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे. शहरातील गुन्हेगारीवर बोलताना अजित पवार यांनी आज टुकार कारट्यांना इशाराच दिला. त्याचवेळी पालकवर्गालाही जबाबदारीची जाणीव करुन दिली.

    या घटनेबाबत एका खासगी कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, शहरात वेडेवाकडे प्रकार घडता कामा नयेत. सहयोगच्या परिसरामध्ये जे काही काल घडले. त्याबाबत डीवायएसपी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांना मी माझ्या पद्धतीने बोललो आहे. त्यांनी त्याची नोंद घेतली आहे. त्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. पण अशा प्रकारात मी कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असे सांगताना त्यांनी दादा स्टाईलने इशाराही दिला.

    दुसरीकडे पालकांना जबाबदारीची जाणीव करुन देताना अजित पवार म्हणाले, बारामतीकर पालकांनो आपण आपल्या मुली, मुलांना ते कुठे जातात? कुणाशी बोलतात? त्यांचे मित्र परिवार, मैत्रिणी कोण आहेत? यांच्याकडे देखील लक्ष द्या. ही सुद्धा आई-वडिलांची जबाबदारी आहे. कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही लोक प्रतिनिधी, पोलिस विभाग लक्ष द्यायला तयार आहोत. पण जसा काल प्रकार घडला, तसे प्रकार पुन्हा घडता कामा नये, मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, अशी ग्वाही यामिनित्ताने अजित पवार यांनी पालकांना दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed