• Mon. Nov 25th, 2024
    धक्कादायक! श्रीगोंदयात मानवी तस्करी, मोठं रॅकेट उघड; लोकांना डांबून भीक मागायलाही लावतात

    अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यरत असलेल्या टोळ्या या मानवी तस्करी करून लोकांना डांबून ठेवून, मारहाण करत वेठबिगारी करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून चौघांची सुटका करण्यात आली आहे.या घटनेत मानवी तस्करी करत इतर राज्यातील मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणून त्यांच्याकडून घरची आणि शेतातील काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवर अशा लोकांकडून भीक मागून घेतली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी पिलाजी भोसले, अमोल भोसले , अशोक भोसले , गंज्या काळे या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

    आरोपींच्या ताब्यातून सलमान उर्फ करणकुमार आत्मजनेहरू (छत्तीसगड), ललन सोपाल (बिहार) , भाऊ मोरे (बीड) , श्री शिव (कर्नाटक) यांची सुटका करण्यात आली आहे. परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळ्या लोकांना पाच-पाच हजारात महाराष्ट्रात विकले जाता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यात आणखी मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    बेलवंडी शिवारात अशा प्रकारचे मानवी तस्करी होत असल्याची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनचे पीआय संजय ठेंगे यांना मिळाली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र तीन पोलीस पथके तयार करून शेंडगे वस्ती खरातवाडी श्रीगोंदा या ठिकाणी छापा टाकला असता पिलाजी भोसले यांच्याकडे वेठबिगारी म्हणून कामात असलेला सलमान उर्फ करण कुमार छत्तीसगड येथील मजुराची सुटका करण्यात आली.

    दुसरी कारवाई घोटीवी श्रीगोंदा बोडके मळा शिवारामध्ये अमोल गिरीराज भोसले यांच्या घरी छापा टाकला असता ललन सुखदेव सोपाल हा बिहार येथील मजूर सापडला. तर, तिसरी कारवाई घोटीवी श्रीगोंदा पाचपुते हायस्कूल जवळ करण्यात आली या ठिकाणी अशोक दाऊद भोसले व जंग्या काळे यांच्याकडे भाऊ हरिभाऊ मोरे आंबेजोगाई बीड येथील मजूर आढळून आला.

    पोलिसांचे नागरिकांना आवाहन

    वेठबिगारी प्रथा ही कायद्याने बंद असल्याने अशा प्रकारे कोणी मानवी तस्करी करून अनोळखी व्यक्तींना डांबून ठेवून घरातील, तसेच शेतातील कामे करण्यास भाग पाडत असेल किंवा मग भीक मागायला लावत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ही माहिती देण्यासाठी पोलिसांनी फोन क्रमांकही प्रसिद्ध केले आहेत.

    फोन क्रमांक-

    पोलीस निरीक्षक संजय ठेंगे- ८४८३०३८९५३
    पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे- ९१६८४५३४२३
    बेलवंडी पोलीस ठाणे- ०२४८७- २५०२३३
    श्रीगोंदा पोलीस ठाणे- ०२४८७- २२२३३३

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed