राहुल गांधी आणि स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळे यांना फोन
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पूर्णवेळ कर्नाटकमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शरद पवार यांच्याशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा करताच राहुल गांधींनी सुप्रिया सुळेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोन वर चर्चा केली आहे.
फोनवरील चर्चेत काय घडलं?
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या राजीनामा घोषणेनंतर फोनवरुन चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत माहिती घेतली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे.
शरद पवार सोलापूर दौऱ्यावर जाणार
शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी वाढल्या आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. पवारांनी राजीनामा मागं घ्यावा, अशी विनंती देखील केली जात आहे. त्याचवेळी शरद पवार शनिवारी ६ मे रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.