म. टा. खास प्रतिनिधी,मुंबईः उत्पन्नवाढीसाठी बेस्ट उपक्रमाने आगारांचा व्यावसायिक तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच ‘इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन’ला सल्लागार म्हणून नियुक्त केले जाणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतरच बेस्ट उपक्रमाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. व्यावसायिक तत्त्वावर विकास करताना आगारांचे आधुनिकीकरण केले जाणार असून सोयीसुविधांचीही भर पडणार आहे.बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३,८०० बस आहेत. दररोज ३५ ते ३६ लाख प्रवासी प्रवास करतात. यातून दररोज दीड ते दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. बेस्ट उपक्रमाचे तिकीट दर देशातील अन्य सार्वजनिक वाहतुकींपेक्षाही कमी आहेत. हे कमी असलेले दर आणि वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पाहता बेस्ट उपक्रम आगारांतून उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या बेस्ट उपक्रमाचे २६ आगार असून कुलाबा, वांद्रे रेक्लमेशन, धारावी, बोरिवली आदी ठिकाणी असलेल्या आगारांची बाजारमूल्याप्रमाणे कोट्यवधी किंमत आहे. उत्पन्न मिळवण्यासाठी आगारांतील मोकळ्या जागा दिवसा खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आल्या. त्यातून मिळणारे उत्पन्नही फारसे नाही. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी बेस्ट उपक्रमाने आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वापर करताना खासगी कंपनी किंवा कंत्राटदारांकडून आगाराचे आधुनिकीकरण करण्याचे नियोजन आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतरच पुढील निर्णय बेस्टकडून घेतला जाईल.
२६ आगारांचा व्यावसायिक वापर आणि आधुनिकीकरण करण्याचे नियोजन यापूर्वीही तयार करण्यात आले होते. खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर ही कामे हाती घेताना व्यावसायिकांना आगारांची जागाही उपलब्ध केली. मात्र व्यावसायिकांनी उत्पन्ननिर्मिती केल्यानंतर ३०० कोटी रुपयांची रक्कम बेस्ट उपक्रमाला दिलीची नाही. सध्या हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे आहे. याची वसुली लवकरच मिळणेही कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यापुढे उत्पन्न मिळवताना आगार विकासाची कामे योजनाबद्ध पद्धतीने करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला.मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चं गिफ्ट, देशातील पहिली डबलडेकर एसी बस सज्ज