• Mon. Sep 23rd, 2024

विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

ByMH LIVE NEWS

May 1, 2023
विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब करुन शालेय शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष अॅप विकसित करुन शालेय शिक्षण क्षेत्राला महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यापीठे आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित काम केल्यास अधिकाधिक शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना उपक्रमांतर्गत ही प्रणाली विकसित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाला अर्थसाह्य केले आहे.

शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेली आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील विदर्भासह सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मनोदय जाहीर करून मंत्री केसरकर म्हणाले, भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे, असे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व शैक्षणिक व्यवस्थांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आजघडीला शालेय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण यांच्यामधील सीमारेषा पुसल्या जाणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांना घडवित असताना वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे, पादत्राणे वगैरे बाबी पुरवितो, मात्र त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता ही उत्तम मार्गदर्शनातूनच येईल. त्यासाठी भाषा, विज्ञान व गणित या विषयांमध्ये त्याला रुची निर्माण व्हावी, या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेल्या या आधुनिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक संकल्पना अधिक सुस्पष्ट होऊन त्यांना त्यात रुची निर्माण होईल. त्यातून केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्येही ते यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण शिवाजी विद्यापीठात सुमारे ५० वर्षांनंतर आल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर यांनी विद्यापीठाच्या बांधणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे आर्किटेक्ट व अभियंते आर.एस. बेरी यांच्या आठवणी जागविल्या. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने पर्यावरण क्षेत्रात केलेले काम आणि गेल्या साठ वर्षांच्या वाटचालीत शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने उंचावत ठेवलेली गुणवत्ता याबद्दल मंत्री केसरकर यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये सध्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांच्या १०४ संकल्पनांचे आधुनिक आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या आधारे सुलभीकरण करण्यात आले आहे. विज्ञानातील अवघड व क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास त्यामुळे सोपे होणार आहे. ही प्रणाली प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमधील आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी या प्रणालीचे निर्माते व विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे डॉ. सुधीर देसाई आणि डॉ. वैशाली भोसले यांनी या आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचे सादरीकरण केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवपुतळा, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाल्याबरोबर मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed