मुंबई, दि. १ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टुर पॅकेज सुरु केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहली, आमची मुंबई मध्ये तीन सहली, हेरिटेज छत्रपती संभाजीनगर आठ सहली, मेस्मरायजिंग कोकण दहा सहली, कल्चरल पुणे सात सहली, स्पिरीचुअल नाशिक चार सहली, मिस्टीकल अमरावती दोन सहली, वाईल्डलाइफ विदर्भ पाच सहली अशा या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टुर पॅकेजसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टुर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग, ०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.
000