• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे राज्य करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2023
    महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे राज्य करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

    नागपूर दि. ०१ : महाराष्ट्र हे  देशात नेहमीच अग्रेसर राज्य राहिले आहे. आगामी काळात त्याला आणखी प्रागतिक करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असून महाराष्ट्र हे  ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ असणारे राज्य करू, असा निर्धार  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

    नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या ध्वजवंदनानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले.

    ते म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात सत्ता परिवर्तनानंतर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान हा शाश्वत विकासाचा मुद्दा हाती घेतला आहे. निसर्गातील काही बदलांमुळे शेतकऱ्यांना  अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली. सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना त्याला जोड म्हणून सुरू केली. केंद्राचे सहा व महाराष्ट्राचे सहा हजार असे एकूण १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्ह्यातील अडचणीत शेतकऱ्यांना आपण अन्नधान्य मिळण्याकरीता ५ जणांच्या कुटुंबाला ९ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षाला २१ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत जमा होणार आहेत. २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

    तथापि, यामुळे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार टप्पा २ सारखी योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.जलसंधारण क्षेत्रात भूजलस्तर वाढल्याबाबत राज्याच्या कार्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला नुकतेच पुरस्कृत केले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार-२ मध्ये कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 243 गावामध्ये ही  योजना राबविली जाणार आहे.  एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देण्याचा महत्वाकांक्षी निर्णयही  शासनाने घेतला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून त्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोबतच नैसर्गिक दृष्टचक्रात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत बारा हजार कोटी रुपये मदत केली गेली. तर नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५० हजार रुपये दिले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी मदत  गेल्या सहा-आठ महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

    महिलांकरता एसटी बसेस मध्ये ५० टक्यांची सूट दिली आहे. घरी मुलीचा जन्म झाल्यावर लेक लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे अशा प्रकारची लखपती योजनाही शासनाने आणली आहे. यासोबत यावर्षी दहा लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी आवास योजना सुरू केली आहे. अनुसूचित जाती, आदिवासी यांच्याशिवाय ओबीसींसाठी यावर्षी तीन लाख घरे या योजनेंतर्गत बांधणार आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 300 पेक्षा जास्त दवाखान्याचे लोकार्पण होत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये १२ दवाखान्याचे आज लोकार्पित होत आहे.

    नागपूरच्या विकासाकडे आपले लक्ष अधिक असल्याचे  यावेळी त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नागपूर जिल्ह्याला अर्थसंकल्पातून भरीव निधी देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नागपूर-गोवा मार्गासाठी  ८६ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपये, मिहान प्रकल्पासाठी आणखी १०० कोटी रुपये, नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी रुपये, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी २२८ कोटी रूपये,शैक्षणिक क्षेत्रात शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ५० कोटी रुपये, संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी २० कोटी रुपये, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त १० कोटी रुपये, संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीसाठी ६ कोटी रुपये,लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरला अभिमत विद्यापीठाचा दर्जा, महाराष्ट्र विधी विद्यापीठ इमारतीसाठी निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाला दीड हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

    आज राष्ट्रगीतासोबत महाराष्ट्र गीत सुद्धा राज्यात म्हटले गेले. आपल्या भाषणात याचा उल्लेख करून त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र हा प्रगतीशील राहिलाच आहे.त्याला अधिक प्रगतीशील करायचा शासनाचा प्रयत्न आहे. आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना सोबत घेऊन एक प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकार हे सातत्याने कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

    कस्तुरचंद पार्कवरील या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्ह्यातील विविध पदावरील सनदी अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी स्वातंत्र्य सैनिक क्रीडा, कला व विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते या ठिकाणी विविध पथकांमार्फत संचलन करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर व महेश बागदेव यांनी केले.

    *****

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed