मुंबई,दि.२८ : जे.जे. रूग्णालयातील रूग्णांना अद्ययावत सुविधा देण्यात याव्यात तसेच खाटांची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १५८४ तक्रारी दाखल झाल्या असून, १६२ तक्रारींचे तत्काळ निराकरण मंत्री श्री. लोढा यांनी केले.
मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील ई वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ १ च्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अजयकुमार यादव यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
या परिसरातील ना.म.जोशी मार्गावर सौंदर्यीकरण करावे, स्थानिकांचे निवृत्ती वेतन तत्काळ सुरू करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेचे नव्याने आलेले अर्ज तपासून घेवून मानधन देण्याची कार्यवाही करावी, अशा विविध तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निराकरण करण्यात आले.
दरम्यान महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच या ठिकाणी बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.
एफ दक्षिण वॉर्ड येथील स्थानिक महिलांना समस्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) अंतर्गत ३१ मे पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर अर्ज दाखल करावेत.
००००
संध्या गरवारे/विसंअ