मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्यावतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवे नेतृत्व तयार केलं जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतील ३५ ते ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जातील. अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली असून ते लवकरच भाजपसोबत हातमिळवणी करतील, अशी चर्चा मध्यंतरी होती. परंतु, अजित पवार यांनी मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहीन, असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही अजित पवार यांच्याभोवतीचे संशयाचे धुके दूर झाले नव्हते. त्यामुळेच शरद पवार यांच्या ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे’, या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
काकांच्या हालचालींकडे लक्ष द्या, राज ठाकरेंचा अजित पवार यांना सल्ला
गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील सुसंवाद चांगलाच वाढला आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अजित पवार यांना महत्त्वाचा सल्ला दिला होता. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना अजित पवारांबद्दल प्रश्न विचारला होता. मला अजित पवार यांच्याबद्दल एका वाक्यात बोलायचे नाही. पण अजित पवारांना मी इतकं सांगेन की, ‘तुम्ही बाहेर जेवढं लक्ष देताय, तेवढंच काकांकडे पण लक्ष द्या’, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
महाराष्ट्र गीतात बारामतीचा संदर्भ, शरद पवारांनी सांगितली रंजक माहिती