भीमा पाटस सहकारी कारखान्यात सुमारे ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन सुमारे महिनाभर राऊतांनी रान पेटवलंय. आज तर राऊत थेट दौंडच्या पाटसमधील भीमा पाटस कारखान्यात धडकले. राऊतांनी कारखान्याची पाहणी करु नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. वीसेक मिनिटे पोलिसांनी राऊतांना अडवून धरलं. पण राऊतांनी राज्यसभा खासदार असल्याचं सांगून हक्कभंगाची भीती दाखवताच पोलिसांनी एक पाऊल मागे घेऊन राऊतांची वाट मोकळी केली. त्यानंतर ठीक साडे सहा वाजता वरवंडला राऊतांच्या सभेची सुरुवात झाली.
उद्धव ठाकरेंचा फोन, संजय- दौंडमध्ये वातावरण कसंय?
संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल कुल यांच्या कारखान्यातील कारभारावरुन जोरदार आसूड ओढले. तसेच पोलिसांच्या आरेरावीचा मुद्दे पुढे करुन कुल यांच्यावर ताशेरे ओढले. मी येणार म्हणून राहुल कुल यांनी कलम १४४ लावायला सांगितला. सभा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. संजय दौंडमध्ये वातावरण कसंय.. मी त्यांना सांगितलंय, साहेब जोरात वातावरण आहे… कलम १४४ लावलं होतं, पण आम्ही आता ते तोडलंय, असं उद्धव ठाकरे यांना फोनवरुन सांगितल्याचं राऊतांनी आपल्या भाषणात सांगितलं. उपस्थितांनी तुफान टाळ्यांनी राऊतांच्या लढाऊ बाण्याचं कौतुक केलं.
विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करायची, हे सत्ताधारी पक्षाचं धोरण आहे. राहुल कुलवरती आरोप करुन दोन महिने झाले, पण साधी चौकशी झाली नाही. पुढच्यावेळी इथे मी किरीट सोमय्या यांना आणणार आहे. जर नाही आले तर कॉलर पकडून आणेल. तुम्ही मिस्टर कुल असाल तर मी मिस्टर हॉट आहे, अशी कोटी करत राऊतांनी राहुल कुल यांना सुनावलं. २०२४ साली केंद्रात आणि राज्यात आपले सरकार येणार आहे. तुम्हाला बघतो कोण वाचवतो ते… असा इशाराही राऊतांनी कुल यांना दिला.
कलम १४४ ची भीती दाखवूनही लोक माझ्या सभेला जमले. भ्रष्टाचारी चेअरमनच्या कानाखाली मारलेली ही सनसनीत चपराक आहे. माझा आवाज कुणीही बंद करु शकत नाही. मोदी-शहांना देखील ते जमलं नाही. आज दौंडवासियांना शब्द देतो भीमा पाटस कारखाना जोपर्यंत सुरु होऊन स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत सभासदांच्या खांद्याला खांदा लावून मी लढत राहिन, असं आश्वास्त करुन संजय राऊतांनी भाषणाला पूर्णविराम दिला.