महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत १४ लोकांचा जीव गेला तर शेकडो लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. याप्रकरणी राज्य शासनावर सध्या सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी रोखठोक मतं मांडली. या मुलाखतीत त्यांनी राज्य शासनाचा पूर्णत: बचाव करत आप्पासाहेबांनी दिलेल्या वेळेनुसारच कार्यक्रम घेतला गेला, तसेच कार्यक्रमस्थळी सोयीसुविधांची कोणतीच कमतरता नव्हती, असा दावाही त्यांनी केला.
राज्य शासन, आयोजक आणि स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी विविध स्तरातून पुढे आली. तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये? या प्रश्नाचं उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “काही घटना या नैसर्गिक असतात. मुंबई शहरात इमारती पडतात. त्यावेळी आपण काय मुंबई महापालिकेवर गुन्हे दाखल करत नाही. नैसर्गिक घटनांचं राजकारण करणं टाळलं पाहिजे”, असं सांगताना इमारत दुर्घटना आणि खारघर दुर्घटनेची मी तुलना करत नसल्याचं सांगायला देखील मुनगंटीवार विसरले नाहीत.
“नियोजनात फक्त सरकारी अधिकारी नव्हते. श्री सदस्य, धर्माधिकारी यांच्या जवळचे लोक असे सगळे होते. त्यांनी संध्याकाळी कार्यक्रम घ्यायला नको, दुपारीच घ्या, अशी सूचना केली होती. कारण दुपारी कार्यक्रम आवरल्यानंतर लोक संध्याकाळपर्यंत घरी पोहोचू शकतात, असा त्यांचा मानस होता. बरं… नियोजनाचं बुकलेट ४० ते ६० पानांचं होतं. सरकारने अतिशय सूक्ष्म नियोजन केलं होतं. पाण्याची सोय होती. पण इतका उष्माघात असेल याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्वत: समोर बसल्या होत्या. सरकारला खरोखर उष्माघाताची कल्पना नव्हती. पाण्याची सोय असताना काही श्री सेवक उठले नाहीत. त्यांना त्रास झाला. १४ लोक मृत्यूमुखी पडले तर काही जणांना उष्माघाताचा त्रास झाला. काही जणांना तासाभरात, काहींना एक दिवसात दवाखान्यातून सोडून देण्यात आलं”, असंही मुनगंटीवार म्हणाले.
सरकार मृत्यूचा आकडा लपवत आहे, या आरोपांवर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “काही लोक असा खोटा मेसेज पसरवत आहेत. लोकांची दिशाभूल करणं सुरु आहे. पण मृत्यूचा आकडा माहिती नसताना खोटा आकडा का सांगितला जातोय ते माहिती नाही. पण मंत्री म्हणून मी सांगू इच्छितो १४ मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि उष्माघाताने त्रास झालेल्या रुग्णांचा नेमका आकडा सध्या माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो”