मुंबई, दि. १८ : राज्यातील महिला सक्षमीकरणाचा निर्धार करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाचा महिला व बालविकास विभाग व बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई क्षेत्रातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी “सरकार आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जात आहे.
महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालविकास विभाग नेहमीच कटिबद्ध आहे. या उपक्रमात मुंबईतील सर्व माता-भगिनींनी सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.
‘सशक्त नारी – समृद्ध भारत’ हा मूलमंत्र समोर ठेऊन शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ‘सरकार आपल्या दारी’ (फक्त मातृशक्तीसाठी) हा अनोखा उपक्रम येत्या १९ एप्रिलपासून संपूर्ण मुंबईत राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात दुपारी तीन ते सायंकाळी ५.३० या वेळेत राज्य शासनामार्फत महिलांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी काम केले जाणार आहे. यासाठी विभागाचे अधिकारी देखील सहकार्य करणार असून, महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकद्वारे माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे.
****
संध्या गरवारे/विसंअ/