यंदाच्या आंब्याच्या मोसमात जनता वसाहतीतील मुलींनी पहिल्यांदाच कोकणच्या राजाची चव चाखली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रसरशीत आंब्यांचा आस्वाद घेताना जिभेला सुटलेले पाणी, रसामुळे माखलेले हात, रंगलेले चेहरे आणि हास्यकल्लोळात दंग झालेल्या मुली, असे लोभनीय दृश्य प्रियम राठी हिच्या प्रथम स्मृती दिनी उपस्थितांनी अनुभवले.
‘मनसोक्त आंबे खाऊया’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रियमच्या मित्रमैत्रिणी व निरामय संस्थेच्या वतीने जनता वसाहत येथील जनता सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी सुमारे ६० ते ७० मुलींनी आंब्यांचा आस्वाद घेतला. तर कै. प्रियम राठीच्या मित्रमैत्रिणींनी प्रियमच्या आठवणींना उजाळा दिला.
दोन भावंडांनी घरासमोर उभारलं मायचं मंदिर; फायबरपासून बनवला आईचा हुबेहूब पुतळा
प्रियम विषयी भावना व्यक्त करताना तिचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र राठी म्हणाले ” प्रियम मास मीडिया कम्युनिकेशनची विद्यार्थिनी होती, तसेच ती सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सदैव अग्रेसर असे. स्नूकर खेळणे, पर्यटन, साहसी क्रीडा प्रकारात सहभाग, ट्रेकिंग, फोटोग्राफी, मेंडोलीन वाजविणे, ढोल पथक, मॉडलिंग, इत्यादी अनेक उपक्रमात प्रियम, उत्स्फूर्तपणे सहभाग असे. प्रियमला आंबे खाणे आवडायचे. यातूनच तिने भटकंतीची हौस पुरविण्यासाठी ‘प्रियम आम’ या ब्रॅण्ड खाली आंबे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मुलींच्या रुपाने जणू प्रियमनेच मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद लुटल्याचे समाधान लाभले.”