यासंदर्भात जस्ट स्माईल चॅरिटेबल ट्रस्टच्या स्नेहा विसारिया यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एका व्यक्तीविषयी तक्रार आली होती. ही व्यक्ती गिरगाव परिसरातील मांजरींना अणकुचीदार खिळे असलेल्या काठीने मारत असल्याचे आम्हाला समजले. आम्ही फेब्रुवारी महिन्यात पोलिसांना याबाबत कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत केतकर यांना समज दिली होती. परंतु, त्यानंतरही चंद्रकांत केतकर हे खिळे असलेल्या काठीने मांजरींना मारत राहिले. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे स्नेहा विसारिया यांनी सांगितले. स्नेहा यांच्या तक्रारीनंतर गिरगावच्या व्ही पी रोड पोलीस ठाण्यात चंद्रकांत केतकर यांच्याविरोधात प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
चंद्रकांत केतकर यांनी आतापर्यंत गिरगाव परिसरातील तब्बल डझनभर मांजरींना खिळे असलेला दांडका मारून जखमी केले आहे. चंद्रकांत केतकर ज्येष्ठ नागरिक असल्याने सुरुवातीला तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले. मात्र, त्यानंतरी चंद्रकांत केतकर सुधारले नाहीत. ते खाडिलकर रोडवर खिळे असलेल्या काठीने मांजरींना मारत राहिले, त्यांना जखमी करत राहिले. चंद्रकांत केतकर हे मांजरांना मारतानाचा व्हिडिओ काहीजणांनी चित्रित केला. हा व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांकडे देण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी केतकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. या कारवाईनंतर प्राणीप्रेमी स्नेहा विसारिया यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, खिळे लागून जखमी झालेल्या मांजरींवर सध्या उपचार सुरु आहेत. याप्रकरणात चंद्रकांत केतकर यांच्यावर पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.