परभणी : परभणी जिल्ह्याला आज अवकाळी पावसाचा चांगलाच तडाका बसला आहे. शेतातील ज्वारी, शेवटच्या वेचणीसाठी आलेला कापूस या पिकांना फटका बसला आहे. असे असतानाच शेतामध्ये कापूस वेचताना साठ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील मांडेगाव येथे घडली आहे. इंदुबाई नारायण हांडे असे वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.परभणीमध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळीचा फटका परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, सेलू तालुक्यातील पिकांना बसला. शेतात असलेल्या ज्वारीच्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेवटच्या वेचणीसाठी असलेल्या कापसाला देखील याचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वीज पडून महिलेचा मृत्यू
शेतामध्ये कापूस वेचत असताना इंदुबाई नारायण हांडे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. इंदुबाई हांडे यांच्या अंगावर वीज कोसळल्याचं आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्याकडे धाव घेऊन उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंदुबाई हांडे यांना तपासून मृत घोषित केले.मयत इंदुबाई हंगे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्या सकाळी नऊ वाजता शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. कापूस वेचत असताना अचानक सकाळी दहा वाजता वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंड असा परिवार आहे.