बुलेट ट्रेनवरील बीकेसी आणि शिळफाटा स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा असेल. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर जवळपास ३५ किलोमीटर इतके आहे. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर, बोगदा पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.
“प्रस्तावित हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर ठाणे खाडीतून जाणार आहे. हा भाग फ्लेमिंगो आणि जवळच्या खारफुटीसाठी संरक्षित अभयारण्य आहे. त्यामुळे एका बोगद्याद्वारे समुद्राखालून रेल्वे ट्रॅक तयार केले जातील. जेणेकरुन परिसंस्थेला कुठल्याही त्रास होणार नाही” असे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सांभाळणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे.
सर्वात लांब रेल्वे वाहतूक करणारा हा भारतातील पहिला अंडरसी (समुद्राखालील) बोगदा असेल. हा बोगदा १३.२ मीटर रुंदीची ट्विन ट्रॅक (अप-डाऊन दोन्ही मार्गांची) सिंगल ट्यूब असेल. हे बांधकाम आवश्यकतेनुसार न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) आणि टनेल बोरिंग मशीन (TBM) या दोन्ही पद्धतींनी केले जाईल. प्राधिकरणाने प्रकल्पासाठी पाण्याखालील सर्वेक्षण यापूर्वीच केलेले आहे.
महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा ५०८.१७ किमी लांबीचा कॉरिडॉर आहे. यापैकी ३४८ किमी भाग गुजरातमध्ये, १५६ किमी भाग महाराष्ट्रात, तर अवघा चार किमी भाग दादरा नगर हवेलीत येतो. ९२ टक्के मार्ग एलिव्हेटेज, ६ टक्के अंडरग्राऊण्ड बोगदा, तर दोन टक्के जमिनीवर असेल.
पुणेकरांसाठी मेट्रोचं नवं पाऊल; 100 फूट खोल भुयारी मार्गातून धावली मेट्रो
मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना १२ स्थानकांद्वारे जोडले जाईल. मुंबई बीकेसी, ठाणे शिळफाटा, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती ही ती बारा स्थानके. या प्रकल्पाची अंदाजे किंमत १.१ लाख कोटी रुपये इतकी आहे. प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.