• Mon. Nov 25th, 2024
    ​अरविंद सावंतांची मानसकन्या गेली, दुर्गाताईचा भाईकाका भावुक, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट​

    मुंबई : ठाकरे गटातील युवासेनेच्या सचिव, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि अनेक सेना नेत्यांच्या विश्वासू सहकारी अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांचं हदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या केवळ ३० वर्षांच्या होत्या. काल ठाण्यातील जनप्रक्षोभ सभेला सत्ताधाऱ्यांविरोधात आरोळी देण्यात दुर्गाताई अग्रभागी होत्या. अर्धा मोर्चा संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. नंतर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवसेनेचं फूल उमलण्याआधी नियतीने क्रूर घाव घातला, काळजाच्या ठिकऱ्या झाल्या, अशा शब्दात सेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी दुर्गाताईंच्या जाण्यानंतर आपलं दु:ख व्यक्त केलंय.दुर्गा कुठे आहेस तू? असं विचारल्यानंतर पुढच्या काही वेळात दुर्गा समोर उभी राहायची. तिची आदित्य ठाकरेंवर अपार निष्ठा होती. शिवसेनेवर प्रचंड प्रेम होतं. भोसले शिंदे परिवाराची लाडकी माझी मानसकन्या कधी झाली, कळलंही नाही. उमलणारे फुल फुलण्याआधी गळून पडावे. विधात्या तू एवढा कठोर का झालास.. माझ्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्यात, अशा शब्दात खासदार सावंतांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली आहे.

    अरविंद सावंत यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

    “दुर्गा” कुठे आहेस तू ? आली, आली साहेब… आली आणि दत्त म्हणून पुढ्यात उभी राहायचीस… नम्रपणे, थोडा उशीर झाला तर अपराधिकपणे, अलीकडे कुणास असे वाटते का? एक मनस्वी, निष्ठावान, आज्ञाधारक युवा सेनेची कार्यकर्ती, माननीय आदित्यजींवर अपार निष्ठा, प्रेम, आदर.. केशवराव भोसलेंची सुकन्या, किरण शिंदेंची पत्नी, भोसले शिंदे परिवाराची लाडकी, होतकरू, प्रेमळ मुलगी, माझीही मानसकन्या कधी झाली कळलं नाही!

    मी त्यांच्या परिवाराचा अविभाज्य घटक कधी झालो माहिती नाही. पण अखंड परिवाराचे प्रेम मला मिळाले. अलीकडेच २४ मार्चला ताडदेव पोलीस वसाहतीत वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा महोत्सवात तिची भेट झाली. आग्रहाने यावयास लावले होते. थेट दिल्लीहून कार्यक्रमास गेलो होतो. उत्साह ओसंडून वाहत होता तिच्या चेहऱ्यावर!! अतिशय गोड, मनमिळावू स्वभाव. समंजसपणा तर ओतप्रोत भरलेला. सवंगड्यांना सांभाळून घेण्याची कला तिला अवगत होती. कुणाची चूक झाली की त्याला समजावयाचे आणि वरिष्ठांकडे त्याची वकिली करून पुन्हा कार्यात सामावून घ्यायचे, ही तिची कला विलक्षण होती.

    युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदेंचं हार्ट अटॅकने निधन, ठाण्यातील महामोर्चात झालेल्या सहभागी
    लोकसभा निवडणुकीत तिने आणि तिच्या परिवाराने केलेले काम विसरू शकत नाही. हा हा म्हणता माननीय आदित्यजींचीही ती लाडकी कार्यकर्ती झाली. युवासेनेच्या कार्यात तिने स्वतःला झोकून दिले होते. उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. मलबार हिल सारख्या मतदार संघात महापालिकेची निवडणूक ती शिवसेना पक्षाची उमेदवार म्हणून लढली. त्या निवडणुकीत तिने स्वतःची प्रतिभा आणि प्रतिमा सिद्ध केली होती. पराजय झाला म्हणून खचूनही गेली नाही वा कुणाला दूषणे देत बसली नाही. पुन्हा जोमाने कामाला लागली. छोट्या मोठ्या घटना घडल्या की तिचा फोन यायचा , संवाद साधायची, मार्गदर्शन विचारायची. खूप जीव लावला मुलीने…

    उमलते फुल होते… स्वप्न होते. ते स्वप्न साकार होण्याआधी नियतीने एवढा क्रूर घाव घातला

    माझे भाषण झाले की तिचा बोलका प्रतिसाद यायचा, खूप आदर होता. दुर्गा आणि किरण ही जोडी अगदी हसत हसत सर्व कार्यात सहभागी असायचे. तिच्या शारीरिक वेदनांचा कधी तिने बाऊ केला नाही. खरे तर भोसले शिंदे घरण्याचेच नव्हे तर शिवसेनेचे ते सामाजिक, राजकीय पटलावरील उमलते फुल होते… स्वप्न होते. ते स्वप्न साकार होण्याआधी नियतीने एवढा क्रूर घाव घालावा की काळजाच्या ठिकऱ्या व्हाव्यात. उमलणारे फुल फुलण्याआधी गळून पडावे. विधात्या एवढा कसा रे तू क्रूर! तुला नाही माफ करता येणार… जन्म दिलास तर त्याचा आनंद, आस्वाद , संघर्ष अगदी सुख दुःखासहित घेऊ द्यायचा होता.

    दुर्गा, तू हा हा म्हणता दुर्गाताई झालीस पण ताई म्हणून तुझ्याकडेही सहकार्य, आशीर्वाद, मार्गदर्शन घेण्यासाठी छोटे तरुण, तरुणी डोळे लावून बसले होते. तुझे बोट धरून चालावे असे त्यांनाही वाटत होते. तुझे यश त्यांना पहायचे होते, आनंदाने नाचायचे बागडायचे होते… पण तू अशी अर्ध्यावर कशी सोडून गेलीस. विधात्या तुला हे शोभले नाही आणि पचणारही नाही, कारण तिने जीव लावलेली सारी मुले तिचे स्वप्न साकार करण्यासाठी उभी राहतील.

    ज्यांना सर्व काही दिले असे अनेकजण शिवसेना सोडून गेले पण त्याही परिस्थितीत दुर्गा तू ज्या निष्ठेने उभी राहिलीस, साथ दिलीस, त्याला तोड नाही. तुझ्या निष्ठेल भाईकाकाचा सलाम.. तुझा अलीकडचा मेसेज ” Please , let us meet once you return! Long due!! तसाच हृदयात स्पंदने करीत आहे. आता कधी भेटणार….?? डोळे आसवांनी भरले आहेत तो मेसेज वाचताना आता आसवांनी भरलेल्या डोळ्यांना तो ही दिसत नाही, तुझ्यासारखा ….

    भोसले शिंदे परिवाराच्या दुःखात मी आणि माझा सावंत तसेच शिवसेना परिवार सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याचे बळ भोसले शिंदे परिवारास मिळो आणि विधात्या आता तरी विश्वासघात करू नकोस तिच्या आत्म्याला सद्गती दे, ही प्रार्थना!! दुर्गा तुला साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली !!!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *