• Mon. Sep 23rd, 2024

नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील

ByMH LIVE NEWS

Apr 5, 2023
नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील

मुंबई, दि. 5 : राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर आणि महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसिलदार यांची प्रशासनाबाबत भूमिका सकारात्मक असून, कामेही पूर्ण आहेत. त्यांच्या कामाचा पूर्वेतिहास पाहता शासन त्यांच्या मागणीबाबत नैसर्गिक न्याय तत्त्वाचा अवलंब करीत आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच कार्यवाही सुरू केली असून, लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आश्वासित केले.

प्रशासनाच्या कामकाजावर या संपाचा परिणाम होऊ नये यासाठी नायब तहसिलदारांनी संप मागे घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed