• Mon. Nov 25th, 2024

    नागरी तक्रारींविरुद्धच्या आवाजाला बळ, मुंबई पालिकेचे आता नवीन चॅटबॉट, अशी करा तक्रार

    नागरी तक्रारींविरुद्धच्या आवाजाला बळ, मुंबई पालिकेचे आता नवीन चॅटबॉट, अशी करा तक्रार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांची माहिती मुंबईकरांना पालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटमध्ये मिळत असतानाच आता ट्विटर, इन्स्टाग्राम आणि पालिकेच्या वेबसाइटवरही मल्टीमीडिया चॅटबॉट उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांची किंवा जवळच्या रुग्णालयांची माहिती मिळवणे, मालमत्ता कर किंवा अन्य शुल्क अदा करणे, पालिकेच्या कामांची तक्रार करण्यापासून अन्य माहितीही पालिकेच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून, येत्या जूनपासून ही सेवा सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.मुंबई पालिकेचे ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वेबसाइटही आहे. मात्र चॅटबॉट सुविधा नाही. फक्त पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांच्या कामांची माहिती आणि तक्रारी इथपर्यंतच मर्यादित असलेली ही सेवा चॅटबॉटशी जोडून त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. पालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर मिळणाऱ्या सुविधा ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वेबसाइटवरही देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्वरित माहिती उपलब्ध करतानाच तक्रारींचा निपटाराही झटपट होण्यास मदत मिळणार आहे. ट्विटर, इन्स्टाग्राममार्फत एखाद्या पालिका सेवेचे शुल्क अदा केल्यानंतर त्याची पावती मात्र नोंद असलेल्या मोबाइल क्रमांकावर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ट्विटर, इन्स्टाग्राममार्फत चॅटबॉट एखादी सूचना किंवा अॅलर्टही देऊ शकणार आहे. मुंबई पालिका व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे दररोज ७ हजार ६४५ वापरकर्ते असून २४ हजारांहून अधिक मेसेज या चॅटबॉटवर येत असतात. यामध्ये विविध सेवांची माहिती, त्यांच्या लिंक उपलब्ध करण्यासोबतच तक्रारींचा निपटाराही केला जातो.

    वॉर्डांमधील तक्रारींनाही आवाज

    मुंबई पालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधेचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यामध्ये पालिकेच्या ८०पेक्षा अधिक सेवांची माहिती पालिकेच्या ८९९९२२८९९९ या व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांकावर उपलब्ध करण्यात आली. यामध्ये आरोग्य सेवा, पालिका शाळा, हेरिटेज वॉक, बेस्ट बस सेवा, पालिका वॉर्ड, नागरी सेवा, आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक यासह अन्य माहिती मिळतानाच वॉर्डमधील विविध कामांविरोधात तक्रारही करण्याची सेवा या चॅटबॉटमध्ये देण्यात आली. एकत्रित माहिती आणि तक्रारीची नोंद घेत असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed