• Sat. Sep 21st, 2024

मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

ByMH LIVE NEWS

Apr 1, 2023
मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी दोन वेळा लढा द्यावा लागला. पहिला लढा हा ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होण्याचा होता. दुसरा लढा हा भारतात जी काही संस्थाने शिल्लक होती, त्यापैकी आपल्या संस्थानाला स्वतंत्र देशात निर्माण करू पाहणाऱ्या निजामाशी लढा द्यावा लागला. निजामाची प्रवृत्ती ही भारताच्या अखंडतेला आव्हान देणारी असल्यामुळे मराठवाडा मुक्तीच्या लढ्याचे मोल हे स्वातंत्र्य लढ्याइतकेच महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बंदाघाट येथे भव्य व्यासपीठावर आयोजित उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार तथा समिती अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत तांबोळी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, समिती सदस्य प्रा. सुनील नेरलकर, शंतनू डोईफोडे, श्रीमती आनंदी विकास, लक्ष्मण संगेवार, बालाजी बच्चेवार व इतर सन्माननीय सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या सर्व व्यूहरचनेला वेळीच ओळखले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरूवातीपासून मराठवाडा मुक्तीसाठी बाळगलेला ध्यास सरदार वल्लभभाई पटेल यांनी ओळखला. निजामशाहीत जे अत्याचार झाले त्याला सीमा नव्हती. लोक शांततेत सारे सहन करत होते. त्याची जुलमशाही जेव्हा वाढली तेंव्हा लोकांना हत्यार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिशन पोलो यशस्वी राबवून अखेर मराठवाड्याला मुक्तीचा श्वास दिला. मराठवाड्याच्या मुक्तीचा हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच आवश्यक आहे. इतिहासाची पाने ही प्रेरणा देणारी असतात हे विसरून चालणार नाही, याची आठवण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली.

पायाभूत सुविधा विकासाएवढेच आपले सांस्कृतिक वैभव व इतिहासाच्या पानात दडलेले वैभव जतन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मराठवाडा मुक्तीचा हा लढा नव्या पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र हा दिल्लीचे तख्त राखणारा असून देशाच्या वैभवात राज्याचे महत्त्व अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे मोल नव्या पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी समिती वेगवेगळे उपक्रम आखत आहे. अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून शासनातर्फे प्रातिनिधिक स्वरुपात जिल्ह्यातील 16 स्वातंत्र सैनिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 1 मे रोजी जिल्ह्यातील 6 लाख विद्यार्थी मराठवाडा मुक्तीची ही गाथा वृद्धींगत करण्यासाठी एकाचवेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात हाती घेतलेल्या विविध कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

या कार्यक्रमात मराठवाडा मुक्त्तिसाठी नांदेड जिल्ह्यात झालेल्या विविध महत्त्वपूर्ण घटनांची संक्षिप्त माहिती देणाऱ्या स्मृतीदर्शिकेचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांचा व मान्यवरांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवृत्ती कौसल्ये व बापू दासरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed