• Sat. Sep 21st, 2024

नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

ByMH LIVE NEWS

Apr 1, 2023
नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि.1(जिमाका) : देशाची वाटचाल आणखी प्रगतीच्या देण्यासाठी होण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा 28 वा पदविका प्रदान समारंभ मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे तथा उद्योजक रवी डोली, सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, प्रभारी प्राचार्य डी.एम. गर्जे, परीक्षा नियंत्रक पी.पी. खेडकर, नियामक मंडळाचे सदस्य तथा उद्योजक राजेश पिरळकर व विजय पत्की, संजीव शिवपूरकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते स्नातकांना पदविका प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यभरातील नामांकित तंत्रनिकेतन महाविद्यालयांपैकी एक कोल्हापूरचे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे, ही अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत गौरव करुन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात तरुणांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील तरुण आणि त्यांच्या अंगी असलेली बुद्धिमत्ता, प्रमाणिकपणा व नम्रता ही देशाची ताकद आहे. या गुणवत्तेच्या जोरावरच जगातील बहुतांशी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भारतीय वंशाच्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. येत्या काळात हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढेल असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, सध्या व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. पदविकाधारक विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच शिक्षण न थांबवता पदवी व डॉक्टरेट मिळवण्यासाठीही प्रयत्न करावेत. कौशल्य शिक्षण व व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी विविध क्षेत्रात संधी असून यासाठी विद्यार्थ्यांनी त्या त्या क्षेत्राला आवश्यक असणारे ज्ञान, माहिती घ्यावी.

रवी डोली म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिक्षण व प्रशिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांनी केवळ इंटरनेटवरील माहितीवर विसंबून न राहता विविध उद्योगांना भेटी देऊन उद्योजक, तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधून अधिकाधिक ज्ञान, माहिती, कौशल्य आत्मसात करावे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा. तसेच विविध कौशल्ये आत्मसात करुन उद्योग निर्मितीतून स्वतःसह कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed