• Fri. Nov 15th, 2024

    जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान २.०; ८५ गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 30, 2023
    जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान २.०; ८५ गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती – महासंवाद

    नंदुरबार,दिनांक.30 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): जलयुक्त शिवार अभियान 1 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्या तील 85 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

    पिकाच्या ऐनवाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषि क्षेत्रावर होतो. जिल्ह्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषि क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2015-16 ते 2018-19 या कालावधीत राबविण्यात आली होती.

    यापुर्वी जलयुक्त शिवार अभियान 1 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 423 गावात एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधीत विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्धरित्या अंमलबजावणी करुन जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करुन शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण झाली आहे.

    आता जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्या तील 85 गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून त्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 20 गावे, नवापूर 6, शहादा 14, तळोदा 9, अक्राणी 17 तर अक्कलकुवा 19 अशा प्रकारे 85गावांचा समावेश असणार आहे.

    अशी होईल गावांची निवड

    गावांची निवड करतांना जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम), नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेतंर्गत पुर्ण झालेली तसेच कार्यान्वीत असलेली गावे वगळता उर्वरित गावांपैकी पाणलोट कार्यक्रम अंमलबजावणीसाठी अवर्षण प्रवण तालुक्यातील गावे, भूजल सर्वेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर यांचे पाणलोट प्राधान्य क्रमानुसार गावे, अपूर्ण पाणलोट, ग्राम सभेच्या मान्यतेने, लोकसहभाग, स्थानिक जिल्हा समितीने शिफारस केलेली तथापि पाण्याच्या ताळेबंदावर आधारीत निकषांच्या आधारे गावांची निवड करण्यात येईल.

    दृष्टीक्षेपात जलयुक्त शिवार 2.0

    • जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान 2.0
    •  जिल्ह्यातील 85 गावांचा समावेश
    •  जलयुक्त शिवार अभियान एक मध्ये 423 गावांमध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी
    •  सर्वाधिक नंदुरबार तालुक्यातील 20 गावांचा समावेश
    •  अक्कलकुवा 19, अक्राणी 17, शहादा 14, तळोदा 9 व नवापूर 6 गावांचा समावेश
      0000000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed