राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 12 हजार 74 पात्र खातेधारक असून पोर्टलवर 7 हजार 114 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून 6 हजार 507 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. आतापर्यंत 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांच्या लाभ देण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातील 1 हजार 682 शेतकऱ्यांना (7 कोटी 63 लाख 95 हजार 979), शहादा 2 हजार 947 शेतकऱ्यांना (13 कोटी 91 लक्ष 22 हजार 681) नवापूर 570 शेतकऱ्यांना (2 कोटी 20 लक्ष 10 हजार 309) तळोदा 360 शेतकऱ्यांना (1 कोटी 74 लक्ष 93 हजार 440) अक्कलकुवा 52 शेतकऱ्यांना (22 लाख 84 हजार 182 रुपये ) आणि अक्राणी तालुक्यातील 132 शेतकऱ्यांना (40 लाख 23 हजार 944 रु.) लाभ देण्यात आला आहे.
राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन 2015-2016 ते 2018-2019 या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती. तसेच, राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होवू शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. ही परिस्थिती विचारात घेवून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अशी होती योजना..
या योजनेस “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना” संबोधण्यात येईल. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी वर्ष 2017-2018 वर्ष 2018-2019 आणि 2019-2020 हा कालावधी विचारात घेण्यात येईल. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आला आहे.
वर्ष 2017-2018 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, 2018 पर्यंत पुर्णतः परतफेड केलेले असल्यास, वर्ष 2018-2019 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2019 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, वर्ष 2019-2020 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा वर्ष 2017-2018 वर्ष 2018-2019 आणि 2019-2020 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी वर्ष 2018-2019 अथवा वर्ष 2019-2020 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मात्र, वर्ष 2018-2019 अथवा वर्ष 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी वर्ष 2018-2019 अथवा वर्ष 2019-2020 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक / अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आली आहे. योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल.
हे होते निकष …
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र झाले आहेत.
000000000