मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पुणावळे भागातून रस्त्यावरून एक सिमेंट काँक्रीटचा ट्रक जात होता. त्याचवेळी त्या ट्रकच्या शेजारून एक व्यक्ती पायी जात होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या त्या व्यक्तीला धडक दिली आणि दुचाकीसह दुचाकीस्वार देखील रस्त्यावर पडले. त्यानंतर दुचाकीस्वार मागून येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
या अपघाताने प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकला. या दुर्देवी अपघाताने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पिंपरी चिंचवड परिसरातील काटे वस्ती भागात हा दुर्देवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शंनी सांगितले. याबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मृत तरुणाचे नाव देखील अद्याप समोर आले नसले तरी अपघाताने अंगावर शहारे उभे राहतात हे नक्की.
पिंपरी चिंचवड परिसरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण दुचाकी वाऱ्याच्या वेगाने चालवतात. त्यामुळे वाहन कंट्रोल न झाल्याने अनेकदा अपघात होत असतात. अल्पवयीन मुलं देखील रस्त्यावर वेगाने गाडी चालवताना पाहायला मिळतात. आज झालेला या अपघातातून धडा घेण्याची गरज आहे. दुचाकीस्वाराने गाडी चालवताना काळजी घेऊन चालवणं गरजेचं आहे. गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.