• Sun. Sep 22nd, 2024

महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम – कृषि आयुक्त सुनील चव्हाण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 8, 2023
महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम – कृषि आयुक्त सुनील चव्हाण – महासंवाद

पुणे, दि.८: आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी व  महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात सर्व महिला अधिकारी / कर्मचारी यांचा सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुख्य अभियंता, अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे,  कृषिविस्तार  प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषि संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.

कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी प्रारंभी महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी -कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘डिजिटऑल-लिंग समानतेसाठी नाविन्यता आणि तंत्रज्ञान’ (डिजिटऑल- इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी) या संकल्पनेवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सर्व महिलांना डिजिटल साक्षर करण्यासह त्यांच्या सर्वसमावेशक विकासाचे काम करणे अपेक्षित आहे.

भारताच्या प्रयत्नामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिलावर्ग आरोग्याप्रती जागृत असतात. भरडधान्य हे पौष्टिक असल्याने महिलांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांचा पुरेपूर वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर म्हणाले, महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्ती प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचे आर्थिक, मानसिक स्थैर्य तसेच आरोग्यासाठी नेहमी झटत असते. त्यामुळे महिलांप्रती आपल्याकडे नेहमीच आदरभाव असला पाहिले. या उपक्रमाच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे, असेही डॉ. पाटोदकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष व महिला दिनानिमित्त अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबद्दल मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे कौतुक केले. त्यांनी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या प्रवेशद्वारातच रेड कारपेटद्वारे महिला वर्गाचे स्वागत करण्यात आले. त्यांचे गुलाबपुष्प, तुळशीचे रोप, पेढा तसेच तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पौष्टिक पदार्थांचे पाकिटं देऊन स्वागत करण्यात आले.

नाविन्यपूर्ण उपक्रम – स्वागताने महिलावर्ग आनंदी

आंतरराष्ट्रीय महिला दिनी शासकीय मध्यवर्ती इमारतीत अशा प्रकारचा आगळावेगळा स्वागत सोहळा प्रथमच होत आहे. या स्वागत सोहळ्यामुळे  मनस्वी आनंद झाला. कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे आभारही मानले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed