• Sun. Sep 22nd, 2024

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

ByMH LIVE NEWS

Mar 8, 2023
पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

मुंबई, दि. ८ : पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ  उपस्थित होते.

राज्य शासनाने सन २०१९ मध्ये महानगरपालिकेचा ठराव विखंडन करुन घरपट्टीमध्ये देत असलेली ४० टक्के सवलत रद्द करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. हे निर्देश रद्द करून पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना यापूर्वी देण्यात येणारी ४० टक्के सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी पुणेकर नागरिकांची मागणी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असून पुढील आठवड्यात  बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणेकर नागरिकांचा हा प्रश्न सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून हा निर्णय अंतिम झाल्यानंतर  पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed