• Sun. Sep 22nd, 2024

विषमुक्त शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

ByMH LIVE NEWS

Mar 4, 2023
विषमुक्त शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

अमरावती, दि. 4 : प्राकृतिक शेती, पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढीसह विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात विषमुक्त शेतीचे क्षेत्र यंदा 25 लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे सांगितले.

          कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे ‘माविम’ व ‘कारितास इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी,  मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात  ते बोलत होते. खासदार डॉ.अनिल बोंडे, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा  अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

          कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यासाठीचे महत्व लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाकडून प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकरीहित हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रत्येक अडचण, संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी, आपत्ती यामुळे नुकसान झालेल्या  2 लाख 95 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 560 कोटी 26 लाख एवढी रक्कम जमा करण्यात आली. अद्यापही ही कार्यवाही गतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे, 72 हजार 639 शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी 71 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. विमा कंपन्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम त्वरित अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्यातील एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री. सत्तार पुढे म्हणाले की, कोरोनाकाळात जग थांबले असताना आपला बळीराजा सतत कार्यरत होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी अमरावती विभागातील 36 गावात भेटी देऊन 297 शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातूनही सविस्तर पाहणी करण्यात आली. कापूस, सोयाबीन, कांदा या पीक उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळण्यासाठी या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

          खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, शेतक-यांचा शेतीमाल मध्यस्थी टाळून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. त्यादृष्टीने कृषी महोत्सवासारखे उपक्रम उपयुक्त आहेत. पारंपरिक भरडधान्ये आरोग्यासाठी महत्वाची असून, त्याच्या संवर्धनाला महोत्सवाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत आहे. शेतकरी बांधवांनी प्राकृतिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आवश्यक तिथे पांदणरस्त्यांची निर्मिती होण्यासाठी कामांना चालना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सहसंचालक श्री. मुळे यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. 

कृषिमंत्र्यांकडून विविध स्टॉलची पाहणी

 कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन संशोधक, शेतकरी बांधव, महिला बचत गटाच्या सदस्य, युवक यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या उत्पादनांबाबत जाणून घेतले. महोत्सवाचे आकर्षण ठरलेल्या ड्रोन फवारणी यंत्राच्या प्रात्यक्षिकाची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली. महोत्सवातील ट्रॅक्टर व अत्याधुनिक कृषी साधनांचीही पाहणी करून त्याची वैशिष्ट्ये कृषी मंत्र्यांनी जाणून घेतली.  स्टॉलधारकांकडील खाद्यपदार्थ, पिशव्या, मूर्ती, बांबूच्या टोपल्या, धान्य, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू आदी विविध उत्पादनांची माहिती घेत त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed