• Sat. Sep 21st, 2024

शेतकऱ्यांनी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळावे – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

ByMH LIVE NEWS

Mar 3, 2023
शेतकऱ्यांनी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळावे – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

            सांगली दि. ३ (जिमाका) :  रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर यामुळे शेतीत नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नैसर्गिक, सेंद्रिय, ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कृषी विभागाने यासाठी नियोजन करावे, त्यास शासन स्तरावरून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागाची आढावा बैठक सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात  पार पडली.  बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अधिकारी जालिंदर पांगरे, सातारा जिल्ह्याचे  कृषी  उपसंचालक विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, पाण्याच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होत असून याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. नापिक जमिन सुपीक बविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करुन या जमिनीवर पिके घेण्यासाठी नवनवीन वाणांचे संशोधन करावे. तसेच शेतीमध्ये नवीन उपक्रम राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.  सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून तृणधान्य हा सकस आहार आहे. याचा आहारात अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार आणि प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. तृणधान्याचे मार्केटींग करून उपहारगृहे व रूग्णालयात रूग्णास देण्यात येणाऱ्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत.

शेती आणि शेतकरी हा मुख्य घटक मानून राज्य शासन कृषी विषयक योजना आखते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने कटिबद्ध राहावे. कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना कृषी मंत्र्यांनी  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

सांगली जिल्हा हा सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला जिल्हा असल्याचे सांगून कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, जिल्ह्याने द्राक्ष, हळद यामध्ये आपले वेगळेपणे सिद्ध केले आहे. येथील शेतकरी विविध समस्यांवर मात करुन जिल्ह्यात हरित क्रांती घडवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांना घरपोच सातबारा देण्याचा महसूल यंत्रणेचा प्रयत्न आहे. याबरोबरच नवीन तंत्रज्ञानानुसार बी-बियाणे देण्यासाठी, तसेच बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्यावर कारवाई करणे, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना हवे ते देण्यासाठी महसूल विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगली जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रम याची माहिती दिली. सातारा जिल्ह्याचे कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार यांनी आभार मानले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed