• Sat. Sep 21st, 2024

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी

ByMH LIVE NEWS

Mar 3, 2023
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी

           सोलापूर/पंढरपूर दि. ३ : पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत, यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू आहे. या नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाची पाहणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.  यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासक गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्यधिकारी अरविंद माळी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रतिवर्षी लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीची वारी करतात. अधिकाधिक सोयी सुविधा देऊन भाविकांना विठू माऊलीचे दर्शन सुकर व्हावे यासाठी शासन व स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असते. भाविक व कला रसिकांच्या सोयीसाठी असाच एक प्रकल्प नामसंकीर्तन सभागृहाच्या माध्यमातून पंढरपूर येथे साकारत आहे. या नामसंकीर्तन सभागृहाचे काम काही प्रमाणात निधीअभावी अपूर्ण असून, या सभागृहास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. या माध्यमातून पंढरपुरात भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

‘नमामि चंद्रभागा’ योजनेला गती देणार  – मंत्री श्री. मुनगंटीवार

           सोलापूर/पंढरपूर दि. ३ :  अध्यात्मिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी चंद्रभागा नदी स्वच्छ व निर्मळ होणे गरजेचे आहे. यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर राज्यात नमामि चंद्रभागा अभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानाला आता गती देण्यात येणार असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  सांगितले.

आर्यवैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठ्ठल- रुक्मिणी व वेदांत केसरी ब्रम्हीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार प्रशांत परिचारक,  किसन महाराज साखरे, जयवंत महाराज बोधले, नंदकुमार गादेवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान ही वारकऱ्यांसाठी पर्वणी असते. चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तिच्या उगमापासून पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदी काठ स्वच्छ राहावा, सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यादृष्टीने कामे केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांचे जन्मस्थळ असलेल्या सोनपेठ (जि. परभणी) या ठिकाणचा विकास करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री संत साधू महाराज सेवा समिती मठास भेट देवून मठात भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

०००

मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतले श्री विठ्ठल -रखुमाईचे दर्शन

           सोलापूर/पंढरपूर, दि. ३ : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व सदस्या शंकुतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवंजाळ, शिवाजी महाराज मोरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्यधिकारी अरविंद माळी, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed