• Mon. Nov 25th, 2024

    बँकांनी कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट ३१ मार्च पूर्वी पूर्ण करावे: अध्यक्ष नरेंद्र पाटील

    ByMH LIVE NEWS

    Mar 2, 2023
    बँकांनी कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट ३१ मार्च पूर्वी पूर्ण करावे: अध्यक्ष नरेंद्र पाटील

    सांगली दि. २ (जि.मा.का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प व्याज परतावा योजनेमधून  व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज देण्यात येत आहे. या योजनेतून देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आले असून  बँकांनी त्यांना देण्यात आलेल उद्दिष्ट ३१ मार्च पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनाअंतर्गत बँक कर्ज मंजूर प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक महेश हरणे, जिल्हा उद्योग  केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त ज. बा. करीम, महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांच्यासह राष्ट्रीय व सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    बँकेमार्फत देण्यात येत असलेल्या सुविधा व ज्या योजनेतून कर्ज वितरीत करण्यात येते त्याची माहिती बँकेत दर्शनी भागात लावावी,  बँकेमार्फत देण्यात येत असलेल्या योजनांची माहिती ग्रामसभेत द्यावी, कर्ज योजनेबाबत बँकांनी मेळावे घ्यावेत. किरकोळ कारणास्तव कर्ज प्रकरणांचे अर्ज नामंजूर करू नयेत, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कर्जदाराला संधी द्या, अशा सूचना अध्यक्ष श्री. पाटील यांनी बैठकीत दिल्या.

    यावेळी बँकांना देण्यात आलेले कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट, मंजूर व नामंजूर केलेली कर्ज प्रकरणे आणि उर्वरित उद्दिष्टाबाबत बँकनिहाय सविस्तर आढावा  बैठकीत घेण्यात आला.

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेत जिल्ह्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि आयडीबीआय या राष्ट्रीयकृत आणि पलूस सहकारी बँक, हुतात्मा सहकारी बँक आणि राजाराम बापू पाटील सहकारी बँकेचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात २०१८ पासून ३ हजार २८ लाभार्थीना कर्ज वितरित करण्यात आले आहे. या कर्जापोटी २१ कोटी रुपयांचा व्याज परतावा संबंधित कर्जदाराच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यास यावर्षी २४०० कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत ६०० कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून मार्च अखेर उद्दिष्टपूर्तीसाठी बँकाना सूचना देण्यात आल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यात संवाद मेळावा घेण्यात येणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँक व्यवस्थापकांसाठी एक दिवसाची कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. तसेच महामंडळाकडील कर्ज योजनेसाठी नवीन कोड जनरेट करण्याची कार्यवाही करण्यात येत असून या कोडमुळे कर्जदाराचा अर्ज कोणत्या बँकेत कोणत्या स्तरावर आहे याची माहिती मिळणार आहे, असे श्री. पाटील यांनी  बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed