• Sat. Sep 21st, 2024

समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Feb 25, 2023
समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि, २५: मला काय मिळेल याची अपेक्षा न करता निःस्वार्थ भावनेने देशासह राज्यातील कंपन्या आणि संस्था विविध सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सेवाभाव जपत समाज, देश आणि राष्ट्र याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कंपन्या आणि संस्था कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येत्या काळात आपण सर्वजण सामाजिक जबाबदारी ओळखून काम करत रहाल, असा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण कार्यक्रम झाला. कार्यक्रमास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आशिष चौहान उपस्थित होते. कार्यक्रमात सर्च संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात कार्य करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, तर सामाजिक कार्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सोशल चेंज पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे सामाजिक दायित्व अधिक महत्त्वाचे आहे. काही कॉर्पोरेट्स कंपन्या दुर्गम भागात शासन पोचण्यापूर्वीच तिथे पोहचून काम करत आहेत, तर अनेक संस्था त्याही पलीकडे जाऊन स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षा देखील नागरिकांचे सामाजिक दायित्व जपणे अधिक महत्त्वाचे मानतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. समाजात बदल घडून आणण्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने मनापासून काम करणे आवश्यक आहे. दुसऱ्यांचे दुःख स्वतःचे मानून काम करणे हे फार महत्त्वाचे असते, तरच सामाजिक क्षेत्रात चांगले काम होऊ शकते, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड – 2022 पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्षे आहे. ‘द सीएसआर जनरल एक्सलन्स अवॉर्ड्स’मधून नवउद्यमींना प्रोत्साहन तसेच त्यांना नव्या कामासाठी उत्तेजन देण्यासाठी केले जाते. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी आणि ग्रामीण विकास आणि आरोग्य आणि स्वच्छता अशा पाच श्रेणींमधून हे पुरस्कार देण्यात आले. संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे समर्पित करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे समाजाला प्रेरणा मिळते, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व विजेत्या कंपनी आणि संस्थांचे अभिनंदन केले.

000

वर्षा आंधळे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed