• Mon. Nov 25th, 2024

    गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2023
    गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही

    सातारा दि.२५: गावच्या विकासात ग्रामपंचायतींचा मोठा वाटा आहे .शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावच्या विकासाबरोबर गावातील नागरिकांना रोजगार कसा मिळेल यासाठी सरपंच व सदस्यांनी  प्रयत्न करावे असे आवाहन करत विकास कामांसाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क  तथा पालकमंत्री शंभराज देसाई यांनी दिली.

    पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर ,ता. पाटण येथे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी  सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी ,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे,रविराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

    पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्याबरोबर शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले. पाटण तालुका डोंगरी भाग असून या डोंगरी भागाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देत आहे या निधीमधून लोक उपयोगी विकास कामे दर्जेदार करावीत. कामाचे प्रस्ताव योग्य पद्धतीने तयार करून संबंधीत विभागाला पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.

    जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० शाळा आदर्श शाळा करण्यात येणार आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा ही उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या दोन्ही उपक्रमांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घ्यावा. या उपक्रमाला नाविन्यपूर्ण योजनेतून तसेच शासनाच्या विविध योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

    घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण यासाठी विविध योजनांतून मिळणाऱ्या निधीसाठी  सरपंचांनी पुढाकार घ्यावा. गावच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता एकजुटीने विकास कामे करावी. विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. डुड्डी म्हणाले की, सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा उपक्रम व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या ह्या योजनांमध्ये लोकसहभाग घेतल्यामुळे या योजना  प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठी मदत झाली. देशभरात जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या नळ कनेक्शन मीटर बसवण्यात यावे, यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मोठी मदत होईल. शासनाची कोणतीही योजना राबवत असताना लोकसहभाग घ्यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.

    या कार्यशाळेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *