मुंबई, दि. २३ :– मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत पहिल्या टप्प्यात २३८ लाभार्थ्यांना छोट्या व्यवसायांसाठी प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्जाची रक्कम लवकरच थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली. मोठ्या व्यवसायाकरिता कर्ज मंजुरीसाठी पात्रतेच्या अटी व शर्तीप्रमाणे छाननी सुरु आहे. लवकरच मोठ्या व्यवसायांसाठीही कर्ज मंजूर करण्यात येईल, असे डॉ. शेख यांनी सांगितले.
कर्ज मंजुरी पत्र प्राप्त झालेल्या लाभार्थींनी वैधानिक दस्ताऐवज व इतर कागदपत्रांची पूर्तता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामध्ये करावी. कर्जाची रक्कम संबंधित अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कर्ज मंजुरीसाठी व कर्जाची रक्कम प्राप्त किंवा वितरित करण्यासाठी महामंडळामार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क, फी आकारण्यात येत नाही. लाभार्थींनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या किंवा दलाल यांच्या प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे.
केंद्र शासनामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेअंतर्गत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीपासून म्हणजेच ११ नोव्हेंबर, २०२२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. क्रेडीट लाईन १ अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत तर क्रेडीट लाईन २ अंतर्गत ३० लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. मुदत कर्ज योजनेअंतर्गत मोठ्या व्यवसायासाठी कर्ज मंजुरीसाठी पात्रतेच्या अटी व शर्तीप्रमाणे छाननी सुरु आहे. लवकरच मोठ्या व्यवसायांसाठीही कर्ज मंजूर करण्यात येईल. मोठ्या व्यवसायांसाठी साधन सामग्रीसाठी आवश्यक असलेली रक्कम पुरवठादाराच्या खात्यामध्ये वितरित करणे प्रस्तावित आहे. खेळत्या भांडवलासाठी आवश्यक असलेली रक्कम लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात छोट्या व्यवसायांसाठी कर्ज मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती डॉ. शेख यांनी दिली.
या योजनेसाठी आताही अर्ज स्वीकारण्यात येत असून इच्छुकांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील मुख्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे. महामंडळाच्या कार्यालयांची यादी, पत्ते, संपर्क क्रमांक महामंडळाच्या https://www.mamfdc.
०००