• Tue. Nov 26th, 2024

    ग्रामविकास योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 17, 2023
    ग्रामविकास योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक: 17 फेब्रुवारी, 2023(जिमाका वृत्तसेवा): ग्रामिण भागाच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

    गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात आज जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक शिक्षण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या विविध पुरस्कार वितरण प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषेदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांच्यासह पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सदस्य, गटविकास अधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आपले गाव आदर्श बनविण्यासाठी गावकऱ्यांची जिद्द व इच्छाशक्ती महत्वाची असून प्रत्येक गावाने आपला आदर्श इतर गावांनाही मागदर्शक कसा ठरेल यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी
    भविष्यातही केलेल्या मेहनतीत सातत्य राखणेही तितकेच आवश्यक आहे, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे त्रैमासिक आरोग्य तपासणी कार्डचे अनावरण पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी
    पालकमंत्री म्हणाले की, या सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष जागेवर जावून नियमित तपासणी करून हेल्थ कार्डवर वेळोवेळी नोंदी अद्ययावत होणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक माहिती शाळेतील वर्गशिक्षकांकडे रेकॉर्ड स्वरूपात राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना
    आवश्यकता भासल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पुढील उपचारसाठी त्यांना संदर्भीत करून त्याबाबत पाठपुरवा करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हे कार्ड महत्वाचे ठरणार असून
    यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुस्थितीत राहून आजारपणामुळे शाळेतील त्यांचे अनुपस्थितीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

    पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांच्या आवारातील उपलब्ध जागेवर महिला बचत गटांमार्फत
    तयार करण्यात आलेल्या उत्पादनाला विक्रीची व्यवस्था होण्यासाठी यंत्रणांचे सहकार्य अपेक्षित आहे. गेल्या वर्षात साधारण 5 हजार बचतगट समूहांना 122 कोटी रकमेचे बँकांमार्फत अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या बचतगटांमार्फत शेती, पशुपालन, गृहोद्योग,
    शिक्षण व आरोग्य यासाठी वित्तपुरवठा करण्यात येत असून यातून महिलांना पाठबळ मिळत आहे अशी माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत 3 महिला स्वयंसहाय्यता समूहांना प्रत्येकी 1 लाख 50
    हजार व एका समूहाला तीन लाख रुपये रकमेच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्‍यात आले.

    जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व बालकांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातून 100 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येतील. यासाठी प्रत्येक तालुक्यांतून शाळा संख्येच्या प्रमाणात 6 ते 7 शाळा अशा एकूण 100 शाळांची निवड आदर्श शाळा विकसित करण्यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेस विद्यार्थांसाठी टॅब, डिजीटल बोर्ड, दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परिक्षांची तयारी, आंतरराष्ट्रीय शिक्षण विचारांशी सुसंगत अध्ययन अध्यापन प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात 100 शाळांचे रूपांतर हजार शाळांमध्ये होण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची पिढी घडविण्यासाठी व शाळांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्धतेसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आहे. तसेच यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माझी शाळा आदर्श या उपक्रमाच्या माहितीचे सादरीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

    या पुरस्कारांचे झाले वितरण….
    आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना 2022-23
    नाशिक तालुक्यातील दरी, इगतपूरी तालुक्यातील शिरसाठे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे, पेठ तालुक्यातील कोपुर्ली बु., सुरगाणा तालुक्यातील बुबळी, कळवण तालुक्यातील सुळे, दिंडोरी तालुक्यातील करंजवण, बागलाण तालुक्यातील पिंपळदर, देवळा तालुक्यातील वरवंडी, चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी, मालेगांव तालुक्यातील भारदेनगर, नांदगाव तालुक्यातील बोराळे, निफाड तालुक्यातील थेरगाव, येवला तालुक्यातील महालखेडा (पाटोदा), सिन्नर तालुक्यातील वडांगळी ग्रामपंचायत.

    उमेद अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता समुहांना धनादेशाचे वाटप
     श्रीकृष्ण महिला स्वयंसहायता समुह, करंजाळी ता. पेठ,
     ओमसाई महिला स्वयंसहायता समुह, करंजाळी, ता. पेठ,
     सुकन्या महिला स्वयंसहायता समुह, अंबाई, त्र्यंबकेश्वर
     कंसारी महिला स्वयंसहायता समुह, विल्होळी, ता. नाशिक
    विनोबा शिक्षक सहायता ॲप
    १. विजय भाऊसाहेब सहाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेवगेडांग
    २. वर्षा चौधरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंबाळे
    ३. सुशिला मधुकर चोथवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निनावी
    ४. मनिषा दिलीप भामरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंशी
    ५. नरेंद्र सोनवणे, जिल्हा परिषद शाळा, मुंढेगाव
    ६. आशा निवृत्ती बढे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाऊसाहेबनगर
    विनोबा शिक्षक सहायता ॲप मधील क्रियाशिलतेनुसार माहे जानेवारी, 2023 मधील जिल्ह्यातील अग्रेसर गट व केंद्र
    1. निलेश डी. पाटील, गटशिक्षणाधिकारी
    2. योगेश भांबरे, केंद्रप्रमुख,केंद्र घोटी
    3. कैलास शेळके, केंद्रप्रमुख, विंचूर दळवी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed