• Tue. Nov 26th, 2024

    महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची  भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Feb 17, 2023
    महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची  भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत व रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह इमारतीमध्ये तयार  करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ‘सोनचिरैया सुपर मार्केट’चे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सोनचिरैया सुपर मार्केटची पाहणी करुन या मार्केटमधील उत्पादनांची माहिती घेतली.  या सुपर मार्केटमधील सर्व उत्पादने ही महिला बचतगटांनी तयार केलेली आहेत.  त्यामुळे या उत्पादनांचा दर्जा निश्चितच उत्तम असेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

    रत्नागिरीमध्ये सुरु करण्यात आलेल्या सुपर मार्केटप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये बचतगटांसाठी सुपर मार्केट तयार करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    उद्योगमंत्री श्री. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील 160 बचतगटांनी एकत्र येऊन हे मार्केट उभारले आहे.  महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता सोनचिरैया सुपर मार्केट उभारण्यात आले असून राज्यातील पहिले बचतगटांचे सुपरमार्केट रत्नागिरी जिल्ह्यात सुरु करण्यात आल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अभिमान व्यक्त केला. रत्नागिरीमध्ये उभारण्यात आलेल्या या सुपर मार्केटप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही बचत गटांसाठी विक्री केंद्र उभारण्यात येणार असून त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन महामंडळाच्या बसचे लोकार्पण

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागांतर्गत नवीन बसचे लोकार्पण आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

    रत्नागिरी जिल्ह्याकरिता 50 नवीन बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह ते शासकीय विश्रामगृह या मार्गाने प्रवासही केला.

    यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय किरण कुलकर्णी, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed