• Tue. Nov 26th, 2024

    चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Feb 8, 2023
    चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    पुणे, दि. 8 : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन वने,  सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    वनभवन येथे आयोजित चला जाणूया नदीला अभियानाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) सुनीता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवन संरक्षक राहुल पाटील, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, महाराष्ट्र जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग आदी उपस्थित होते.

    श्री. मुनगंटीवार म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. या अभियानास गती देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागांचे सचिव, विद्यापीठांचे कुलगुरु यांना सूचना देण्यात येतील.

    यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विविध सूचना केल्या. या अभियानात समाविष्ट जलप्रहरींनी नदीचे महत्त्व शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना समजावे यासाठी ५ वी ते १० वीच्या पुस्तकात एखादी धडा, कविता समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. वन विभागामार्फत चित्ररथ उपलब्ध करू त्याद्वारे सांस्कृतिक विभागाकडून नदी किनाऱ्याच्या गावांमध्ये जनजागृती करता येईल. या विषयावरील एखादा माहितीपट तयार करावा. नदीच्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण मंडळ आणि काही तज्ज्ञ यांची समिती करून नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात.

    साहित्य संमेलन प्रमाणे नदी सम्मेलन आयोजित करता येईल. यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी, जैव विविधता मंडळाचे अधिकारी, या क्षेत्रातील सामाजिक संस्था आदींना सहभागी करता येईल. त्या अगोदर व्हिडिओ स्पर्धा, निबंध स्पर्धा घ्याव्या. एक वेब पोर्टल करुन त्यावर नदीसंबंधाने ज्ञानवर्धक आणि या विषयाचे गांभीर्य दर्शविणारी माहिती असावी. विद्यापीठ स्तरावर एनएसएस, एनसीसी, शालेय स्तरावर इको क्लब आदींच्या माध्यमातून महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    यावेळी अभियानाबाबत कार्यकारी अभियंता विजय पाटील, जल बिरादरीचे नरेंद्र चुग यांनी सादरीकरण केले. यावेळी राज्यात १०८ नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ४० नद्यांची पाहणी करुन आतापर्यत १५ नद्यांची नदी परिक्रमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केल्याचेही सांगण्यात आले.

    बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी, जलबिरादरीचे सदस्य, अभियानातील नदिप्रहरी आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed