• Sun. Sep 22nd, 2024

शैक्षणिक विकासातून ‘आत्‍मनिर्भर भारत’ निर्माण होईल – मंत्री अतुल सावे

ByMH LIVE NEWS

Feb 5, 2023
शैक्षणिक विकासातून ‘आत्‍मनिर्भर भारत’ निर्माण होईल – मंत्री अतुल सावे

औरंगाबाद, दि. 05 (जिमाका) : आश्रम शाळेतील विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक विकासासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री आणि सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याबरोबरच जागतिक दर्जाचा भविष्‍यवेध विविध उपक्रमातून घेतला जात आहे. यामुळे  शैक्षणिक  विकासातून ‘आत्‍मनिर्भर भारत ‘ निर्माण करण्‍याचे  स्‍वप्‍न पूर्ण होईल असे प्रतिपादन राज्‍याचे इतर मागास बहुजन कल्‍याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज केले.

प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र, निपुण भारत, अधिगम सर्वेक्षण व स्‍पोकन इंग्लिश व प्रौढ साक्षरता या विषयावरील औरंगाबाद विभागस्‍तरावरील कार्यशाळेचे आयोजन वंदे मातरम  सभागृहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेस,आमदार हरिभाऊ बागडे, इतर मागास व बहुजन कल्‍याण विभागाचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव श्री. नंदकुमार , तसेच सर्व सहसंचालक यामध्‍ये औरंगाबादचे जलील शेख, लातूर विभागाचे दिलीप राठोड, कैलास साळुंखे, सिध्‍दार्थ झाल्‍टे, कुशल गायकवाड समन्‍वयक प्रियंका पाटील, निलेश घुगे यांच्‍यासह लातूर, औरंगाबाद, बीड, पुणे विभागातील विविध आश्रम शाळेतील विद्यार्थी, मुख्‍याध्‍यापक, शिक्षक यांची प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थिती होती.

आश्रमशाळेतील   विद्यार्थी सर्वगुणसंपन्‍न, तसेच जागतिक स्‍पर्धेत आपले अस्तित्‍व  निर्माण करणारा व्‍हावा यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्‍यांना टॅब, निवास व  भोजन तसेच विविध सुविधा उपलब्‍ध करुन देण्यात येत आहेत. तसेच परदेशात शिक्षण घेण्‍यासाठी ‘ महाज्‍योतीच्‍या ‘ माध्‍यमातून शिष्‍यवृत्‍ती, प्रशिक्षण आणि परदेशात शिकण्‍याची संधी उपलब्‍ध करुन दिली जात आहे. यामध्‍ये 50 वरून वाढ करुन ती 100 विध्यार्थ्यांना संधी देण्‍यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्‍याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

डिजीटल क्‍लासरुम लवकरच सुरु करुन तंत्रज्ञानाच्‍या  साहायाने सर्व आश्रमशाळेत अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवली जाणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्‍याच्‍या गुणांचे  कौतुक केले. बीड जिल्‍ह्यातील माजलगाव तालुक्‍यातील वारोळा येथील आश्रमशाळेला भेट  देण्‍याची ग्‍वाही विद्यार्थीनींना मंत्री सावे यांनी दिली.

आमदार हरीभाऊ बागडे यांनी या कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून विविध शिक्षक, विद्यार्थी यांना एकत्र आणून विविध विषयाचे अध्‍ययन व अध्‍यापणाबाबत जी चर्चा घडवुन आणली. ती   अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्‍यानी अभ्‍यासाचे नियोजन, प्रयत्‍नातील सातत्‍य आणि स्‍वत: समजून घेण्‍याची क्षमता वाढवली तर शिक्षण सुलभ होते. काळानुसार कौशल्‍य आधारीत शिक्षण घेतले तर प्रत्‍येक क्षेत्रात नोकरी मागण्‍यापेक्षा आपण नोकरी देणारे ठरु यासाठी प्रयत्‍न करावा असे विद्यार्थ्‍यांना  व शिक्षकांना मार्गदर्शनात सांगितले.

लक्षवेधी शिक्षण पध्‍दती ‘वेध’ या उपक्रमामुळे विविध शाळा, विद्यार्थी  यांच्‍यात सकारात्‍मक बदल घडून आनंददायी शिक्षण निर्माण केले आहे.  अशा प्रतिक्रिया  मुख्‍याध्‍यापक श्रीमती राधा, सुबोध काळे, विठ्ठल कचरे, शेखर मांडे यांनी व्‍यक्‍त केल्या. सहभागी विद्यार्थ्‍यांशी संवाद कार्यक्रमातून प्रियंका पाटील यांनी ‘विषयमित्र’ च्‍या माध्‍यमातून वर्गात शिकवलेला अभ्‍यासक्रम समजून घेण्‍यात त्‍यांची भूमिका विद्यार्थ्‍यांना स्वयं अध्‍ययनातून शिक्षण आनंददायी करते असे सांगित‍ले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed