• Tue. Nov 26th, 2024

    तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    ByMH LIVE NEWS

    Feb 3, 2023
    तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. 3 : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

    ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपचार केंद्राचे ई उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सर.ज.जी. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ.भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्षाबाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

    कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना मंत्री श्री. महाजन म्हणाले की, तृतीयपंथीयांच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्या सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयाना पुरुष किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा, मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांवर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.

    या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथीयांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 2 व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर ज.जी. समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे.रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

    राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या 13 जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

    आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथी हा नवीन रकाना असणार असल्याचे या कार्यक्रमादरम्यान प्रस्ताविकात डॉ.सापळे यांनी सांगितले.

    ००००

    वर्षा आंधळे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed