• Sat. Sep 21st, 2024

महसूल दिन राज्यस्तरावर साजरा होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

ByMH LIVE NEWS

Feb 1, 2023
महसूल दिन राज्यस्तरावर साजरा होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 1 : कोविडमुळे राज्यभरात महसूल दिन साजरा करता आला नाही. महसूल विभागाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे अभियान राज्यभर राबविण्यासाठी यंदापासून महसूल दिन राज्यस्तरावर साजरा करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले की, महसूल दिवस राज्यस्तरीय साजरा करीत असताना विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांबरोबरच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.

महसूल खाते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी  निगडीत असलेला विभाग असल्याने या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदभरती, पदोन्नती, भत्ते, ग्रेड पे याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत गतीने निर्णय घेण्यात येत आहेत. महसूल सहायक पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील पदोन्नतीची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात येईल. तर अव्वल कारकुन संवर्गाच्या त्रुटींबाबतही मार्ग काढण्यात येईल असेही  मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या, पदभरती, याबाबत मागण्या यावेळी मांडल्या. यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed