• Mon. Nov 25th, 2024

    भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

    ByMH LIVE NEWS

    Jan 27, 2023
    भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

    जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज दि. 27/01/2023 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

    याबाबत प्रशासन सतर्क असून नागरीकांना सर्वतोपरी मदत करणेस तयार आहे. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

    भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रमांक 0257- 2223180 0257- 2217193 या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा.

    भूकंपा दरम्यान काय कराल ?

    जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?

    घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा. 

    जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?

    पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका. उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.

    भूकंपादरम्यान काय करावे ? 

    जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

    भूकंपानंतर काय करावे ?

    रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

    पालकमंत्र्यांचे आवाहन

    भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *