• Mon. Nov 25th, 2024

    सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घराला लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी – मंत्री गुलाबराव पाटील

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2023
    सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घराला लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी – मंत्री गुलाबराव पाटील

    मुंबई, दि. २४ – सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

    पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी योजनांचे मंत्रालयातून ई-भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमावेळी पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते.

    मंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. या मिशनच्या माध्यमातून शासन घरोघरी नळ पाणी जोडणी देत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक घरात नळ पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. नळ जोडणी कामे लवकर व्हावीत म्हणून याबाबतचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व योजनांना मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही कामे जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांचा दर महिन्यात आढावा घ्यावा व त्याची प्रगती एका नोंद वहीत ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

    केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करुन या मिशन अंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पुनर्जोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के अशी निधीची उपलब्धता असल्याची माहिती मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिली.

    जल जीवनच्या १४० कामांना मंजुरी – मंत्री शंभूराज देसाई

    ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे. पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा आज शुभारंभ झाला असून, या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार असून ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामांबरोबरच जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ही शासनाने निधी आणला.

    पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी ४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. एकूण ३६ हजार ९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील ३४० गावांमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

    यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक ऋषिकेश यशोद (दूरदृश्य प्रणालीद्वारे) मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील,जल जीवन मिशनचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, गट विकास अधिकारी गोरख शेलार उपस्थित होते.

    ००००

    श्रीमती शैलजा देशमुख/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed