• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Jan 20, 2023
    महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, अभयारण्यांतर्गत गावे, सीआर झेड २ अंतर्गत एसआरए प्रकल्प याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा

    मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

    वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक  झाली. यावेळी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

    केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत वन, कामगार, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागाशी संबंधीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कालबद्ध पद्धतीने त्यावर मार्ग काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

    पश्चिम घाट, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र याबाबत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याबाबत श्री. रेड्डी यांनी सादरीकरण केले. राज्य शासन विभाग आणि केंद्रीय वन विभागाच्या तज्ज्ञ समिती सोबत बैठक घेऊन प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य अंतर्गत असलेली गावे पुनर्वसित करताना देण्यात येणारी मदत वाढविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी, पिकांची हानी यासंदर्भात केंद्र शासनाकडून मदत देण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

    केंद्रीय कामगार विभागामार्फत महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण येथे ११०० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार असून त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच काही ठिकाणी उच्चदाब वीज वाहिनी दूर करण्याबाबत चर्चा झाली. या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

    मुलुंड येथे वैद्यकीय महाविद्यालय, तर ठाणे येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय कामगार मंत्री श्री. यादव यांनी यावेळी सांगितले. ठाणे येथील रुग्णालयाचे बळकटीकरण करतानाच तेथे कार्डधारक आणि विना कार्डधारक रुग्णांना सेवा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केली त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    सीआरझेड २ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि मोडकळीस आलेल्या आणि उपकर प्राप्त इमारतींची पुनर्बांधणी करताना विशेष सवलत देण्याबाबत यावी चर्चा करण्यात आली. कांदळवनाच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्रात कांदवळवन कक्ष आणि फाऊंडेशन असून कांदळवनाच्या वाढीसाठी  केलेल्या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्राचे कौतुक यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले. माथाडी मंडळ अंतर्गत माथाडी कामगारांच्या कामगार भविष्य निर्वाह निधी भरण्यासंदर्भात येणाऱ्या समस्येबाबत चर्चा यावेळी झाली. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed