अमरावती, दि. 29 : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 ग्रामीण रूग्णालय आणि एका उपजिल्हा रूग्णालयात सीएसआर (CSR) निधीतून 12 लाख रूपयांची एकूण 14 जलशुध्दीकरण यंत्रे बसवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिली.
डिसेंबर महिन्यात 2 आणि 3 तारखेला आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या आरोग्य केंद्रांचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर काही आरोग्य केंद्रामध्ये पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध व्हावे अशी निवेदने स्थानिक नागरीकांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केली होती. त्याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी सीएसआर फंडातून तात्काळ 12 लाख रूपये निधी मंजूर करून हि जलशुध्दीकरण यंत्रे पुरवण्याचे आदेश दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर वर्कस यांच्या सीएसआर फंडातून ही 12 लाख रूपयांची भरीव मदत आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे शुध्द़ पाणी उपलब्ध़ व्हावे यादृष्टीने आरोग्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेळघाट परिसरातील आरोग्य केंद्रांत जलशुध्दीकरण यंत्रे बसविल्याने जलमय आजारापासून रूग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे संरक्षण होईल. त्यामुळे आदिवासी बांधवांचे आरोग्य उत्त़म राहील, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली आहे.
चौकट
इथे बसवणार जलशुध्दीकरण यंत्रे
प्राथमिक आरोग्य केंद्र | ग्रामीण रूग्णालय | उपजिल्हा रूग्णालय |
1. कळमखार | 1. चुर्णी 2. चिखलदरा | 1. धारणी |
2. साद्रावाडी | ||
3. बिजुधावडी | ||
4. बैरागड | ||
5. हरिसाल | ||
6. धुळघाट रे. | ||
7. सलोना | ||
8. टेंबुरसोंडा | ||
9. सेमाडोह | ||
10. काटकुंभ | ||
11. हतरू |
000